मुंबई : पूनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीचे रूपडे बदलण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. सद्यस्थितीत या वसाहतीच्या देखभाल-दुरूस्तीसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तातडीच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी आज दिल्या.


वांद्रे शासकीय वसाहतीच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने गुरूवारी दुपारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत चव्हाण यांनी ही माहिती दिली. या बैठकीला काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार बाबा सिद्दिकी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव (इमारत) अजित सगणे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि वसाहतीतील रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर ऑफिसेसच्या वेळा बदला, उपनगरीय प्रवाशी संघाची ठाकरे सरकारकडे मागणी

या बैठकीत आमदार सिद्दीकी, आमदार चौधरी आणि रहिवाशांच्या प्रतिनिधींनी तेथील समस्यांची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागानेही एक सादरीकरण करून तेथील परिस्थिती मंत्री अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर बैठकीला संबोधित करताना चव्हाण यांनी राज्य सरकार वांद्रे वसाहतीतील नागरिकांना दिलासा देण्यासंदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले.

या वसाहतीत नवीन इमारती उभारण्याचा प्रकल्प कार्यान्वित झाला असून, तोवर या इमारती सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतचा अहवाल पुढील 15 दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले. दुरूस्ती-देखभालीच्या या कामासाठी लागणारा निधीही तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेबाबत पाच आमदारांच्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे ही बाब मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर ठेवण्यात येईल, असेही अशोक चव्हाण यांनी या बैठकीत सांगितले.

Yulu E Bikes | बीकेसीमध्ये पर्यावरणपूरक ई-बाईक उपक्रमाची सुरुवात