मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. आतापर्यंत मोडकसागर, तुळशी, विहार व तानसा हे चार तलाव भरुन वाहू लागले असून सर्वाधिक पाणीसाठा असलेल्या भातसा धरणात शनिवारी 17 ऑगस्टपर्यंत 6,67,652 दशलक्ष लीटर म्हणजेच 93.11 टक्के इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. मुंबईला पावसाळा संपल्यानंतर पुढील वर्षभरासाठी 14,47,363 दशलक्ष लीटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. त्यापैकी जवळजवळ 45% पेक्षाही जास्त पाणीसाठयाची क्षमता एकट्या भातसा धरणात आहे. या 14,47,363 दशलक्ष लीटर पाणीसाठ्यापैकी तब्बल 6,94,582 दशलक्ष लीटर इतके पाणी साठवण्याची क्षमता भातसा धरणाची आहे. 17 ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत भातसा धरणात 6,94,582 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला असल्याने मुंबईकरांसाठी ही आनंदाची बाब आहे. या एकाच धरणातून मुंबईकरांना पिण्याचे पाणी जास्त प्रमाणात मिळते, तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठीही याच धरणातून पाणी उपलब्ध होते. त्यामुळे हे धरण पावसाळा संपेपर्यंत पूर्णपणे भरणे आवश्यक आहे. तलावांमधील पाणीसाठा अप्पर वैतरण - 2,03,789 दशलक्ष लीटर मोडक सागर - 1,28,925 दशलक्ष लीटर तानसा - 1,44,593 दशलक्ष लीटर मध्य वैतरणा - 1,86,358 दशलक्ष लीटर भातसा - 6,67,652 दशलक्ष लीटर विहार - 29,698 दशलक्ष लीटर तुळशी - 8,046 दशलक्ष लीटर एकूण - 13,67,063 दशलक्ष लीटर