मुंबई : 'बुलेट ट्रेन' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेला असलेला जनतेचा विरोध डावलून पुढे रेटणाऱ्या फडणवीस सरकारसमोर आता नवी समस्या उभी राहत आहे. बुलेट ट्रेनविरोधात आता गोदरेजनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
विक्रोळीतील मोक्याची जागा बुलेट ट्रेनसाठी देण्याला विरोध करत बुलेट ट्रेनचा मार्ग बदलण्यात यावा, या मागणीसह गोदरेजनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 31 जुलै रोजी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
पूर्व उपनगरातील अगदी मोक्याच्या जागेवर गोदरेजचा विस्तृत असा भूखंड पसरलेला आहे. सध्याच्या बाजार मूल्यानुसार या जागेची किंमत हजारो कोटींच्या घरात जाते. गोदरेजच्या या जागेवर बुलेट ट्रेनच्या भुयारी मार्गासाठीचे व्हेंटिलेशन डक्ट उभारण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. यासाठी एकूण 8.6 एकर जागेची गरज भासणार आहे. त्यामुळे हा भुखंड बुलेट ट्रेनसाठी आंदण म्हणून देण्याला गोदरेजचा विरोध आहे.
सुमारे 508 किमी लांबीच्या या बुलेट ट्रेनमधील 21 किमीच्या मार्गाचं भुयारीकरण होणार आहे. यातील एक टप्पा हा गोदरेजच्या विक्रोळी येथील जागेतून जातो. त्यामुळे या जागेवर भुयारासाठी आवश्यक असलेले एअर व्हेंटिलेशन डक्ट्स उभारण्यात येणार आहेत.
मुंबई ते अहमदाबाद या लोहमार्गावर ताशी 350 किमी वेगाने धावणारी ही बुलेट ट्रेन प्रत्यक्षात अवतरण्यास साल 2022 उजाडणार आहे. मात्र या बहुउद्देशीय प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात महाराष्ट्र सरकारची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.
बुलेट ट्रेन विरोधात गोदरेज कंपनीची हायकोर्टात धाव
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
09 Jul 2018 06:41 PM (IST)
विक्रोळीतील मोक्याची जागा बुलेट ट्रेनसाठी देण्याला विरोध करत बुलेट ट्रेनचा मार्ग बदलण्यात यावा, या मागणीसह गोदरेजनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -