कल्याण: आज देशभरात प्रभू रामचंद्रांच्या जन्माचा उत्साह आहे, अर्थात हा जन्मोत्सव तिथीनुसार साजरा केला जातो. मात्र, जर कुणी तुम्हाला तारखेनुसार प्रभू रामचंद्रांचा जन्मदिन कधी, असा प्रश्न विचारला तर???
कदाचित तुमच्याकडे उत्तर नसेल. मात्र कल्याण येथे राहणारे निवृत्त अभियंता प्रफुल्ल वामन मेंडकी यांनी हा तिढा सोडवला. संशोधनाद्वारे 1 जानेवारी इसवी सन पूर्व 5648 ही प्रभू रामचंद्रांची जन्मतारीख असल्याचा दावा प्रफुल्ल मेंडकी यांनी केला आहे. पुणे येथील पुष्पक प्रकाशन संस्थेने प्रफुल्ल मेंडकी यांचे हे संशोधन ‘रामायणाचा खगोलशास्त्रीय शोध’ या नावाने प्रसिद्ध केले आहे.
प्रफुल्ल मेंडकी यांनी संपूर्ण रामायणात निरनिराळ्या प्रसंगी वर्णन केलेली ग्रह-नक्षत्रांची स्थिती, पौर्णिमा-अमावास्यांचा उल्लेख, चंद्र-सूर्य ग्रहणांचे संदर्भ, चांद्रमासात होणारा बदल लक्षात घेऊन, संगणकाचा आणि आधुनिक गणिताचा वापर करून रामायणकालाचे संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. संशोधन करीत असताना, त्यांनी नासा संस्थेतील शास्त्रज्ञांचीही मदत घेतली आहे.
पुणे येथील पुष्पक प्रकाशन संस्थेने प्रफुल्ल मेंडकी यांचे हे संशोधन ‘रामायणाचा खगोलशास्त्रीय शोध’ या नावाने पुस्तक रूपात प्रसिद्ध केले आहे.
रामायणाच्या कालात ऋतूंच्या प्रारंभीचे चांद्रमहिने निराळे होते. कारण चंद्र पृथ्वीपासून हळूहळू दूर जात आहे आणि पृथ्वीच्या परिवलनाची गतीही मंदावत आहे. या सर्व गोष्टींचा विचार प्रफुल्ल मेंडकी यांनी हे संशोधन करताना केलेला आहे.