मुंबई : राज्यात टाळेबंदीला जाहीर होऊन आजअखेर आता साडेतीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. ही परिस्थिती थांबण्यासाठी आणि अनेक कुटुंबांची व्यवसाय बंद असल्यामुळे होणारी आर्थिक कुचंबणा थांबवण्यासाठी हळूहळू अनेक व्यवसायांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप अभ्यासिका सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी परवानगी देण्याची मागणी अभ्यासिका ओनर्स असोसिएशनने केली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा देखील केली आहे. ही बाब लक्षात घेत आता राज्यभरात बंद असणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी असणाऱ्या अभ्यासिका आता पुन्हा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी अभ्यासिका ओनर्स असोसिएशनने खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे. आगामी 13 सप्टेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी तब्बल 3 लाख 80 हजार विद्यार्थी बसणार आहेत. यातील अनेक विद्यार्थी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर याठिकाणी अभ्यासासाठी येतं असतात. परंतु, टाळेबंदीमुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासासाठी घरीच थांबण्याची वेळ आली आहे. सध्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी खूप कमी कालावधी शिल्लक आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आल्या तर अनेक विद्यार्थ्यांना दिलासा भेटेल.



अभ्यासिका चालवणे सध्या अवघड
यासोबतच या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाना देखील दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया निलेश निंबाळकर या अभ्यासिका चालक तरुणाने दिली आहे. याबाबत आणखी बोलताना निलेश निंबाळकर म्हणाले की, टाळेबंदीमुळे आमचा पूर्णपणे व्यवसाय बंद आहे. सध्या अशी परिस्थिती आहे की, अनेक अभ्यासिका चालकांचे मागील तीन ते चार महिन्यांचे भाडे थकले आहे. यासोबतचं लाईट बील देखील आहे. अनेकांना भाडे देता न आल्यामुळे मूळ मालकांनी अभ्यासिकेला टाळे मारून आतील सर्व साहित्य आपल्या ताब्यात घेतले आहे. आता परिस्थिती अशी आहे की, रखडलेले इतके पैसे आता कुठून अचानक भरायचे. जर आम्हाला अभ्यासिका सुरू करण्यास परवानगी मिळाली तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेल्या टाळेबंदीच्या नियमांचं तसेच अभ्यासिकेत सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टनस राखणे या नियमांचं पालन करू.

दिल्ली मधील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द; लवकरचं पदवी प्रमाणपत्र मिळणार : मनीष सिसोदिया


याबाबत बोलताना अभ्यासिका ओनर्स असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष एजाज शेख म्हणाले की, अभ्यासिका चालकांची पूर्णपणे कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. ती रोखण्यासाठी काही निर्बंध घालून प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी अभ्यासिका सुरू करण्यात याव्यात. मुंबईत जवळपास सहाशे ते सातशेच्या आसपास अभ्यासिका आहेत तर एकट्या पुण्यात दीड ते दोन हजारांच्या आसपास अभ्यासिका आहेत.

SSC HSC Results | दहावीचा निकाल 15-20 जुलै दरम्यान तर, बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार