मुंबई: मनसे जर मुख्यमंत्र्यांना ‘भय्याभूषण’ पुरस्कार देणार असेल, तर मनसेला ‘हॉकर्स भूषण’ पुरस्कार द्यायला हवा, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी लगावला. ते कल्याणमध्ये बोलत होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला असं वक्तव्य केलं होतं. त्यावर मनसेने टीकास्त्र सोडलं होतं.

मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार मिळू शकत नाही, पण ‘भय्याभूषण’ पुरस्कार मिळावा, अशा शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली होती.

मनसे आणि मुख्यमंत्र्यांच्या या वादाच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी मनसेला टोला लगावला.

मुंबईला वाढवण्यात मराठी माणसाचा वाटा आहेच, पण त्याचवेळी परप्रांतातून आलेल्या लोकांचं मुंबई वाढवण्यातलं योगदानही महत्त्वाचं आहे, असं आठवले म्हणाले.

शिवाय शिवसेनेचाही उत्तर भारतीय संघ आहे, त्यामुळं राज ठाकरेंनी जरा सामंजस्यानं घ्यावं, असा सल्ला आठवलेंनी यावेळी दिला.

कल्याणजवळच्या आंबिवलीत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य संमेलन झालं. त्याचे उद्घाटक म्हणून आठवले उपस्थित होते.

यावेळी आठवलेंनी राहुल गांधींवरही निशाणा साधला. राहुल गांधी मंदिरात जातात, त्यात काही चुकीचं नाही. पण यामुळे त्यांना आता भाजपा जातीयवादी असल्याची टीका करण्याचा अधिकार राहिला नसल्याचं आठवले म्हणाले. तसंच गुजरातमध्ये यंदाही भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ नव्हे, ‘भय्याभूषण’ द्या : संदीप देशपांडे

इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात : मुख्यमंत्री

मनसेचा पुन्हा राडा, सांताक्रूझमधील फेरीवाले हटवले


नवी मुंबईत मनसेचा राडा, वाशी स्टेशनबाहेरील फेरीवाले हटवले


दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक


विक्रोळीत मनसे उपविभागप्रमुखाला फेरीवाल्यांकडून मारहाण?


मनसे-रिपाइंच्या सभा मोठ्या होतात, पण मतं मिळत नाहीत : आठवले