मुंबई: मुंबई काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारली आहे. काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं, अशा आशयाचं ट्विट मनसे नेते  संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

आज सकाळी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. मात्र हा हल्ला कोणी केला, याबाबत चर्चा सुरु असताना, स्वत: संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन, त्याबाबत स्पष्टीकरण दिलं.

https://twitter.com/SandeepDadarMNS/status/936472538615558144

तीन मनसे कार्यकर्ते ताब्यात

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

काँग्रेस कार्यालयावर हल्ला

आज सकाळीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या काँग्रेस कार्यालयाची नासधूस करण्यात आली. आझाद मैदानाजवळ काँग्रेसचं कार्यालय आहे. या कार्यालयात घुसून मनसेने काँग्रेस कार्यालयाच्या काचा फोडल्या.



हे हल्लेखोर कोण, कुठून आले याचा तपास सुरु होता.  मात्र संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन मनसेने हल्ला केल्याचं  सांगितल्यामुळे हल्लोखोर कोण हे आता स्पष्ट झालं आहे.

दरम्यान हल्लेखोरांनी कार्यालयाची तोडफोड केली असली, तरी कोणत्याही कर्मचाऱ्याला मारहाण झालेली नाही.

संजय निरुपम आणि मनसेचा वाद

हे कार्यालय मुंबई काँग्रेसचं आहे. संजय निरुपम हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. फेरीवाल्यांवरुन सध्य मनसे आणि संजय निरुपम यांच्यात वाद सुरु आहे. त्या वादातूनच हा हल्ला झाला आहे.

अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

दरम्यान ह्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. विचारांची लढाई विचारांनीच लढायला हवी, तोडफोड किंवा मारहाण करुन नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्याकडून निषेध

या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निषेध व्यक्त केला आहे. तसंच हल्लेखोरांना तातडीने अटक करुन, मुंबई पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली.

विक्रोळीत मनसे कार्यकर्त्यांना मारहाण
दुकानदारांनी मराठी पाट्या लावाव्यात, यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांकडून रविवारी दुकान मालकांना निवेदन दिलं जातं होतं. त्याचवेळी स्थानिक दुकानदार आणि काँग्रेस कार्यकर्ता अब्दुल अन्सारी आणि त्याच्या 15 ते 20 साथीदारांनी मारहाण सुरु केली. यात मनसेचे विभागप्रमुख विश्वजित ढोलम आणि इतर 4 जण जखमी झाले.

मनसेच्या गुंडानी पुन्हा मार खाल्ला!

या मारहाणीनंतर संजय निरुपम यांनी ट्विट करुन मनसेवर हल्ला केला होता.  ट्वीटमध्ये संजय निरुपम म्हणाले की, “काल पुन्हा एकदा मनसेच्या गुंडांनी मार खाल्ला. आमचा हिंसेवर विश्वास नाही. पण गरीबांच्या पोटावर पाय देऊन दरदिवशी मनसेच्या गुंडांनी लाथ मारली आणि तेही पोलिसांसमोर तर उत्तर दिलं जाईल. त्यामुळे मनसेने गुंडगिरी सोडावी.”

संबंधित बातम्या

मनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला : संजय निरुपम


अभिनेते नाना पाटेकर यांचे खूप खूप आभार: संजय निरुपम


मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर मनसेची गुंडगिरी : संजय निरुपम


... तर तुम्हालाही मार खावाच लागणार : संजय निरुपम


जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर