मुंबई: मुंबई महापालिकेत तब्बल  900 कोटींचा कचरा घोटाळा झाल्याचा आरोप मनसेने  केला. एका ठिकाणावरील कचरा नेणाऱ्या गाडीची दोनदा नोंद करून हातसफाई केल्याचा आरोप मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केला आहे.

याशिवाय नालेसफाईच्याच घोटाळेबाज कंपन्यांना कामं दिल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

"नालेसफाई कामात ज्याप्रकारे कंत्राटदारांनी  हातसफाई केली, तीच पद्धत मुंबईत कचरा घोटाळ्यातही वापरली आहे. नालेसफाई घोटाळ्याची पद्धतच कचरा घोटाळ्यातही आहे. मुंबईतील कचरा देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये  नेतांना वाहतुकीमध्ये घोटाळा झाला" असा दावा मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला.

याबाबत देशपांडे यांनी टी वार्ड मधील घोटाळ्याची सर्व कागदपत्रे स्थायी समितीत सादर केली.

देशपांडे यांच्या मते असा झालाय कचरा घोटाळा?

  • एका जागेवरील कचरा वाहून नेणाऱ्या गाडीची नोंद दोन वेळा दाखवण्यात आली

  • नालेसफाई कामातील घोटाळेबाज कंपनीलाच कामं देण्यात आली.

  • श्री कविराज इंफ्रास्ट्रक्चर प्रा.लि. आणि विश्वशक्ति इंफ्रास्ट्रक्चर या नालेसफाईत घोटाळा केलेल्या कंत्राटदारांनीच घनकचरा विभागातही समान पद्धतीनं घोटाळा केला.


संदीप देशपांडे यांनी याबाबत आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली आहे.