मुंबई : पुढच्या दोन दिवसात पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा तीन ठिकाणी बंद होणार आहेत. मेट्रो, बस आणि रेल्वेमध्ये पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा 10 डिसेंबर 2016 पासून स्वीकारल्या जाणार नाहीत.

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्या तिकीटासाठी मात्र पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चालणार आहेत, फक्त ऑनबोर्ड केटरिंग (रेल्वेतील नाश्ता किंवा जेवण) घेतल्यास जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. मेट्रो आणि उपनगरी रेल्वे तिकीटासाठी जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. एसटी बसचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार असून अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर गैरसोय टाळण्यासाठी जीवनावश्यक ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारल्या जात होत्या. मात्र या मुदतीचा काही ठिकाणी शेवट होणार आहे. त्यानुसार मेट्रो आणि उपनगरी रेल्वेमध्ये पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा 10 डिसेंबर 2016 पासून स्वीकारल्या जाणार नाहीत.

15 डिसेंबर 2016 पर्यंत इथे 500च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार:

1. केंद्र सरकार आणि राज्य सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांच्या फीसाठी 500च्या जुन्या नोट्या स्वीकरल्या जातील. मात्र फक्त 2000पर्यंतच जुन्या नोटा स्वीकारल्या जातील.

2. केंद्र आणि राज्य सरकारच्या महाविद्यालयातील फीसाठी 500ची नोट स्वीकारली जाईल.

3. ग्राहक सहकारी भांडारमध्ये 500च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील. पण त्याची मर्यादा 5000 पर्यंत असणार आहे.

4. प्री-पेड मोबाइलच्या टॉप अपसाठी 500ची जुनी नोट वापरता येणार आहे.

5. 15 डिसेंबरपर्यंत पाणी बिल आणि वीज बिल यासाठी 500च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील. ही सुविधा फक्त वैयक्तिक आणि घरमालकांसाठी लागू असणार आहे.

6. सरकारी रुग्णालयं

7. विमानतळावरील तिकीट

8. दूध केंद्र

9. स्मशानभूमी

10. पेट्रोल पंप

11. मेडिकल (डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आवश्यक)

12. एलपीजी गॅस सिलेंडर

13. पुरातत्व विभागाच्या वास्तू (उदा. ताजमहल, लालकिल्ला, अजिंठा लेणी)


14. सरकारी बियाणं केंद्र