मुंबई : सीएम चषक कार्यक्रमादरम्यान एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कांदिवलीत आयोजित केलेल्या सीएम चषक कार्यक्रमाच्या डान्स स्पर्धेदरम्यान ही घटना घडली. यामध्ये अनिता शर्मा या 13वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.
कांदिवली पश्चिमच्या लालडी पाडा येथे गेल्या काही दिवसांपासून सीए चषकाचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात आज डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेदरम्यान अनिताचा डान्स सादर करताना मृत्यू झाला आहे.
अनिता डान्स करताना अचानक चक्कर आल्याने खाली कोसळली. त्यानंतर तिला तातडीने जवळील ट्रायडेन्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
अनिताच्या मृत्यूनं शर्मा कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र तिचा कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. अनिताच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर कांदिवली पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.