भिवंडी : जत्रेत जाण्यासाठी टेम्पोत जागा मिळाली नाही म्हणून 7 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. शितल पाटील असे तरुणीचे नाव असून, तिने राहत्या घरात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलं आणि जीवनयात्रा संपवली. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील जुनांदुर्खी गावात घडली आहे.
संपूर्ण राज्यात ग्रामीण परिसरात गुढीपाडव्यानंतर गावा-गावात दरवर्षी जत्रा उत्सव भरवले जातात. असाच जत्रा उत्सव डहाणूच्या महालक्ष्मी देवीचा भरत असल्याने या जत्रेसाठी जुनांदुर्खी गावातील महिला मंडळ 2 एप्रिल रोजी दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी शितलला टेम्पोत जागा मिळाली नाही, म्हणून तिला देवीच्या दर्शनासाठी जाता आले नाही. यामुळे व्यथित होऊन तिच्या मनावर विपरीत परिणाम झाला आणि तिने राहत्या घराच्या खोलीत कोंडून घेत 2 एप्रिल रोजीच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.
शितलच्या घरच्यांना कळताच त्यांनी तिला तातडीने उपचारासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तिची मृत्यूशी झुंज सुरु असतानाच रविवारी तिची प्राणज्योत मालवली.
या घटनेने जूनांदुर्खी - टेंभवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून या घटनेची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.