मुंबई : महाडच्या सावित्री नदी पूल दुर्घटनेत देवदूत बनून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या बसंत कुमारला अखेर मदतीचा हात मिळाला आहे. बसंत कुमार मणक्याच्या विकाराने त्रस्त असून त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. त्यामुळे हा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि पुण्यातील स्माईल फाऊंडेशनने घेतली आहे.


एबीपी माझाने याबाबत वृत्त दिलं होतं. त्यानंतर हे वृत्त पाहताच राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच मंत्री म्हणून आपण बंसत कुमार यांच्या खर्चाची जबाबदारी उचलत असल्याचं गिरीष महाजन यांनी स्पष्ट केलं. पत्रक काढून त्यांनी ही माहिती दिली.

कोण आहे बसंत कुमार?

महाडच्या सावित्री नदीवरील पुलाची ती काळ रात्र तुम्हालाही आठवत असेल. त्या रात्री मुसळधार पावसात सावित्री नदीच्या पुलाचा एक भाग तुटला आणि पुलावरून भरधाव येणाऱ्या 2 एसटी आणि 8 खासगी वाहनं एका मागोमाग पाण्यात कोसळली.

या दुर्घटनेतला एकमेव साक्षीदार...  बसंत कुमार... जो देवदूत बनून धावला आणि पुलावरून येणाऱ्या गाड्यांना थांबवून  हजारोंचे प्राण वाचवले. आज या सर्व आठवणी पुन्हा सांगण्याचं कारण एकच.... आज हाच देवदूत मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

पाठीच्या आजारपणाने तो त्रस्त आहे... झोपायची, जेवायची सोय नाही. केईएम रुग्णालयाबाहेर सध्या बसंत कुमारने आपलं बस्तान मांडलं आहे. सावित्री पुलाशेजारी एका टायर पंक्चरच्या दुकानात बसंत काम करायचा. त्या दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचवल्यानंतर बसंतचं राज्य सरकारने प्रमाणपत्र देऊन कौतुक केल. मात्र आज जेव्हा त्याला मदतीची गरज आहे.. तेव्हा सगळ्यांचे हात रिकामे आहेत..

ज्याने माणुसकीचं जिवंत उदाहरण आपल्यासमोर ठेवलं आज तोच माणुसकीच्या शोधात भटकतोय. एबीपी माझाच्या बातमीनंतर अखेर या देवदुताला मदतीचा हात मिळाला आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या या देवदुताची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो, एवढीच प्रार्थना.

संबंधित बातमी :

देवदूत... काळरात्री शेकडो जणांचा जीव वाचवणारा ढाण्या वाघ!