Police arrested Bangladeshi : घाटकोपर पोलिसांनी आज तब्बल 13 बांगलादेशींना अटक केली आहे. हे सर्व बांगलादेशी नालासोपारा येथे राहत होते. सुरुवातीला एका बांगलादेशीला अटक केली होती. त्याचा तपास करताना तब्बल 13 बांगलादेशींचा शोध लागला आहे. भारतात अनधिकृत घुसखोरी आणी रहिवासी म्हणून ही अटक केली आहे.
काही केल्या बांगलादेशी नागरिकांची भारतातील घुसखोरी कमी होताना दिसत नाही. सातत्यानं कुठे ना कुठे बांगलादेशी नागरिक सापडत आहेत. आज घाटकोपर पोलिसांनी आज तब्बल 13 बांगलादेशींना अटक केली आहे. हे सर्व नागरिक अनधिकृतरित्या या ठिकाणी राहत होते.
पुण्यात जागा घेऊन एका बांगलादेशीने थाटला होता संसार
गेल्या काही दिवसापूर्वी बांगलादेशातून आलेल्या व्यक्तीने भिवंडीत 500 रुपये देऊन बनावट आधारकार्ड काढलं होतं. त्यानंतर भारतीय असल्याचं सांगत त्याने पुण्यात जागा घेऊन संसार थाटला होता. जुलै महिन्यात चार रोहिंग्यासह तो म्यानमारमधून बांगलादेशात आणि बांगलादेशातून थेट पुण्यातील देहूरोड परिसरातील गांधीनगर येथे आला होता. हे चारही लोक पंडित चाळीत बेकायदेशीर पद्धतीने राहत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या चौघांवर कारवाई केली. मात्र याच्यातील एक असलेल्या मुजल्लीम खान यांने पुण्यात 80 हजार रुपयांना जागा विकत घेतली आणि त्या जागेवर घर बांधून संसार देखील थाटला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती.
बनावट पासपोर्टसाठी 5 लाख रुपयांपर्यंतची मागणी
गेल्या काही दिवसापूर्वीच बनावट पासपोर्ट बनवणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार मनोज गुप्ता याला पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली होती. तो दहा वर्षांहून अधिक काळ टूर-ट्रॅव्हल व्यवसायाच्या नावाखाली पासपोर्ट फसवणुकीचा धंदा चालवत होता. त्याने आत्तापर्यंत सुमारे 100 बांगलादेशी नागरिकांना भारताचे बनावट पासपोर्ट बनवून परदेशात पाठवले होते. पासपोर्ट फसवणूक प्रकरणातील ही सातवी अटक आहे. आरोपी मनोज बांगलादेशी लोकांकडून 5 ते 10 हजार रुपये घेत असे आणि आधी त्यांचे आधार आणि पॅन कार्ड बनवत होता. त्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात येत होते. यानंतर आरोपी बनावट पत्त्यांचा वापर करून बांगलादेशींच्या पासपोर्टसाठी अर्ज करायचे. बनावट कागदपत्रेही अपलोड करण्यात आली होती. पासपोर्ट पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्यांनी पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून तेथून पासपोर्ट काढून घेतला. त्यानंतर ते पासपोर्ट बांगलादेशींना लाखो रुपयांना विकले गेले. बनावट पासपोर्टसाठी 5 लाख रुपयांपर्यंतची मागणी केली जात होती.