मुंबई : घाटकोपरमधील सिद्धी साई इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपी सुनील शितपनं तात्पुरत्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. आपल्या आईची तब्येत सध्या फारच खालवली असल्यानं तिची सेवा करण्यासाठी आपल्याला काही दिवसांचा जामीन देण्यात यावा, अशी विनंती शितपनं हायकोर्टाला केली.


न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. हायकोर्टानं शितपच्या अर्जावर मुंबई पोलिसांचा अहवाल मागवला असून त्यांना शितपनं केलेल्या दाव्यांची शहानिशा करुन सोमवारपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश तपास अधिकाऱ्यांना दिले आहेत. पुढील आठवड्यात सुट्टीकालीन न्यायालयात या अर्जावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

यंदाच्या एप्रिल महिन्यात शितपच्या आईची तब्येत अचानक बिघडली आणि तिच्या छातीत दुखू लागलं. शितपच्या परिवारात त्याची आई, पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत. त्यामुळे आईची काळजी घेण्यासाठी, तिला डॉक्टरकडे नेण्या-आणण्यासाठी घरात कुणीही कर्ता पुरुष नाही, असा दावा शितपनं या अर्जात केला आहे.

यंदा पार पडलेल्या पालिका निवडणुकीत घाटकोपर परिसरातून सुनील शितप यांच्या पत्नीनं शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे शिवसेनेत शितप यांचं या परिसरात राजकिय वजन आहे. याचा फायदा घेत शितप बाहेर पडले तर ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येऊ नये, असा दावा या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांच्या वतीनं हायकोर्टात करण्यात आला आहे.

25 जुलै 2017 रोजी झालेल्या घाटकोपर इमारत दुर्घटनेत एकूण बारा जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील शितपप्रमाणेच त्या इमारतीत नूतनीकरणाचं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स, आर्किटेक्ट यांनाही सहआरोपी करण्यात आलं आहे. सुनील शितपकडून सदर इमारतीतील सदस्यांना धमकावलं जात होतं. सुनील शितपला आपण करत असलेल्या कृत्याची पूर्ण माहिती होती, असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले.