palghar News Update :  कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यवतमाळमध्ये सुमारे दीडशे कोटी बाजारभावाची जमीन वाटप केल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यातच आता पालघर जिल्ह्यातील टेंभोडे पालघर येथील मोक्याच्या ठिकाणाचे सुमारे साडेतीनशे कोटी रूपये बाजारभाव असलेल्या 13.61 जमिनीवरील अतिक्रमण दूर करण्याच्या कारवाईला कोण संरक्षण देत आहे? असा प्रश्न सध्या पालघर जिल्ह्यात उपस्थित होतोय. 
 
पालघर नगरपरिषद क्षेत्रातील टेंभोडे येथील सर्व्हे नंबर 67/68 मधील सुमारे 35 एकर जमिनीवर पाच जणांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणधारकांचा जमिनी नियमानुकुल करण्याचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला होता. त्या पाच अतिक्रमणधारकांमध्ये नगरसेवक सुभाष पाटील यांचाही समावेश आहे. 


पालघर तहसीलदारांनी तालुक्यातील गुरुचरण जमिनीवर अतिक्रमण केलेल्या 543 अतिक्रमण धारकांना कारवाईची नोटीस बजावली आहे. त्यात टेंभोडे येथील सुमारे 35 एकर जमिनीवर नगरपरिषद निर्मिती दरम्यान अतिक्रमण करण्यात आलेले आल्याचे समोर आले. यात नगरसेवक सुभाष विष्णू पाटील यांनी दोन हेक्टर, गजानन परशुराम किणी दोन हेक्टर, प्रशांत अनंत पाटील दोन हेक्टर, विश्वनाथ तानाजी पाटील आणि ललित ठकसेन पाटील यांनी अनुक्रमे 1.40 हेक्टर अशा एकूण 13.61 हेक्टर जमिनीवर अतिक्रमण केले होते. या अतिक्रमित जमिनीला कागदोपत्री 1 ई चे संरक्षण मिळावे यासाठी ही मंडळी अनेक वर्षापासून मंत्रालयात प्रयत्नशील होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही जागा कुणालाही देऊ नये असे आदेश पारित केल्याने त्यांचे मनसुबे आजपर्यंत यशस्वी झाले नव्हते. परंतु, राजकीय बळाच्या जोरावर या सर्वांनी हे अतिक्रमत नियमित करून घेतले होते. 


आता उच्च न्यायलयाने गुरुचरण जमिनीवर कारवाई बाबत माहितीचे शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाचे धाबे दणाणले आहेत. नगरपालिकेची निवडणूक लढवून विजयी झालेल्या एखाद्या नगरसेवकाने जमिनीवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्या विरोधात नगरपालिका आणि नगरपंचायत 1965 च्या अधिनियमानुसार कारवाई होत त्याचे नगरसेवक पद रद्द करता येते, त्यामुळे सुभाष पाटील यांचे नगरसेवक पद रद्द होते का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 


 या अतिक्रमण प्रकरणी आम्ही कारवाई करणार आहोत. मात्र ज्या पद्धतीने आम्हाला पोलिस बंदोबस्त हवा आहे तो अजून प्राप्त झालेला नाही. बंदोबस्त प्राप्त होतात आम्ही कारवाई करणार आहोत, अशी माहिती तहसीलदार सुनील शिंदे यांनी दिलीय.