मुंबई : गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या गणरायाला उद्या निरोप देण्यात येणार आहे. गणपती विसर्जन सुरळीत पार पडावं, यासाठी विविध सरकारी यंत्रणांनी चांगलीच कंबर कसली आहे.


मुंबईत विसर्जनस्थळी सीसीटीव्ही, ड्रोनची नजर

विसर्जन ठिकाणी पालिका कर्मचारी, अग्निशमन पथक, वैद्यकीय पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत. मुंबईत 69 नैसर्गिक, तर 31 कृत्रिम विसर्जन स्थळ सज्ज करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आणि ड्रोनची नजर असेल. जलप्रदूषण टाळण्यासाठी जास्तीत जास्त गणेशभक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जन करावं असं आवाहन महापालिकेने केलं आहे. तसंच विसर्जनाच्या मार्गावरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. तर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा मरीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी हायटेक तराफा वापरण्यात येणार आहे.

गणपती विसर्जनला वाहतुकीमध्ये बदल

- 55 रस्ते वन वे

- 49 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

- 18 रस्त्यांवर अवजड वाहनांची वाहतूक बंद

- 99 रस्त्यांवर पार्किंगला मनाई

विसर्जनाला शहरातील हे मार्ग बंद

- जे. एस. एस. रोड, चिरा बाजार

- जगन्नाथ शंकरशेठ रोड, गिरगाव

-  एस.व्ही.पी. रोड, गिरगाव

- सी. पी. टँक रोड, काळबादेवी

- डॉ. बी.ए. आंबेडकर रोड, परेल

-  न.चिं. केळकर रोड, दादर

- रानडे रोड, दादर

- लिंकिंग रोड

- जुहू तारा रोड

- आरे कॉलनी रोड

- एलबीएस रोड, कुर्ला आणि मुलुंड

यंदाही मानाच्या गणपतींचं हौदात विसर्जन

यंदा पुणेकरांनी गणपती विसर्जनादरम्यान पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतल्याचं दिसत आहे. नैसर्गिक विसर्जन स्थळांशिवाय पालिकेकडून कृत्रिम स्थळही उभारण्यात येत आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील मानाच्या गणपतीचं नदीऐवजी हौदातच विसर्जन केलं जाणार आहे. तसंच जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेशभक्तांना अमोनियम बायकार्बोनेटचं वाटप करण्यात येत आहे.

नाशिकमध्ये 800 पोलिसांचा फौजफाटा

तर बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिकमध्येही जोरदार तयारी सुरु आहे. नाशिकमध्ये दुपारी 3 वाजल्यानंतर मोठ्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. विसर्जनासाठी 800 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.