Ganeshotsav 2022 : कोरोना महासाथीचे संकट काही प्रमाणात ओसरल्याने यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) मोठ्या उत्साहाने पार पडत आहे. गणेशोत्सवाच्या या उत्साहात मात्र, आवाजाचा दणदणाट (Noise Pollution) वाढला आहे. मुंबईतील काही ठिकाणी आवाजाने 115.6 डेसिबल इतकी पातळी गाठली असल्याचे समोर आले आहे. 


आवाज फाउंडेशनने केलेल्या पाहणीत मुंबईत आवाजाची पातळी वाढली असल्याचे समोर आले आहे. कोरोना आजाराचे संकट ओसरल्यामुळे दोन वर्षानंतर सण-उत्सवावरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सव मंडळांकडून लाउडीस्पीकर, डीजेचाही वापर करण्यात आला. वर्ष 2019 पासून गणेशोत्सवाच्या काळात कमी झालेले ध्वनी प्रदूषण यंदा वाढले असल्याचे आवाज फाउंडेशनने म्हटले. गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी बाबूलनाथ परिसरात सर्वाधिक 115.6 डेसीबल तीव्रतेच्या आवाजाची नोंद करण्यात आली. तर, वांद्रे लकी जंक्शन परिसरात 112. 1 डेसीबल आवाजाची नोंद करण्यात आली असल्याचे आवाज फाउंडेशनने म्हटले. 


त्याशिवाय, मुंबईतील एस.व्ही. रोड, अॅट्रिया मॉल वरळी, माहीम, लिकिंग रोड परिसरातसुद्धा आवाजाची पातळीदेखील 105 डेसिबलपेक्षा अधिक होती असे आवाज फाउंडेशनच्या अहवालात नमूद करण्यात आले. वर्ष 2019 मध्ये 
सर्वाधिक आवाज 111.5 डेसिबल इतका नोंदवण्यात आला होता. यंदाच्या वर्षी मात्र गणेशोत्सव काळात आवाजाची पातळी 115 डेसिबलपेक्षाही अधिक असल्याचे समोर आले आहे. 


मिरवणुकांमुळे आवाजात वाढ


105 डेसिबलपेक्षा अधिक आवाजाची नोंद झालेल्या ठिकाणी विसर्जन मिरवणुका आणि गणेशोत्सव मंडळाचे कार्यक्रम सुरू होते. गणपती विसर्जन मिरवणूक आणि गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये ढोल-ताशे ड्रम लाऊड स्पीकर आदींचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने या आवाजाच्या पातळीमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण आवाज फाउंडेशनने नोंदवले. 


विसर्जनाच्या दिवशी आवाज आणखी वाढणार?


गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी, अनंत चतुर्थी दिनी विसर्जन मिरवणुकीत यापेक्षा अधिक आवाजाच्या पातळीची नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


गणेशोत्सवाचा उत्साह


गणेशोत्सव कोणतेही निर्बंध नसल्याने मुंबईसह महाराष्ट्रात उत्साह दिसून येत आहे. अनेक सुप्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. काही ठिकाणी गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. दोन वर्षानंतर गणेशोत्सव साजरा होत असल्याने अनेक मंडळांनी विविध कार्यक्रम, उपक्रमांचेही आयोजन केले आहे. मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यातही मोठी गर्दी उसळली होती.