मुंबई : दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) चरणी 60, 62, 000 रोख रक्कमेच्या दानाची नोंद करण्यात आली आहे. तर राजाला दुसऱ्या दिवशी 183.480 ग्रॅम सोन्याचे दान भाविकांकडून करण्यात आलंय. तसेच 6,222 ग्रॅम चांदीच्या दानाची नोंद करण्यात आली. राज्यात सध्या गणेशोत्सवाचा (Ganeshostav) उत्साह पाहायला मिळतोय. तर लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी राजाच्या चरणी 42 लाख रुपयांची रोख रक्कम जमा करण्यात आली होती. तर यामध्ये 198.550 ग्रॅम सोने आणि 5440 ग्रॅम चांदीच्या वस्तू राजाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या होत्या.
पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळपास 20 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवुड कलाकार, राजकीय नेत्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर उशिरापर्यंत लालबागचा राजा मंडळाकडून पहिल्या दिवशी दान आलेली रोख रक्कम, वस्तूंची मोजदाद पूर्ण करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी करण्यात आलेल्या दानाचे देखील मोजदाद मंडळाकडून करण्यात आली आहे.
लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोन्याचांदीच्या या वस्तूंचा नंतर लिलाव केला जातो. त्यातून जमा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. मुंबईतील गणेशोत्सव हा देशातीलच नाही तर परदेशातील नागरिकांचा देखील उत्सुकतेचा विषय आहे. त्यातच लालबाग, गिरगाव यांसारख्या भागातील गणेशोत्सव हा अगदी दणक्यात साजरा केला जातो. लालबागचा राजा, गणेश गल्ली म्हणजेच मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी या गणपतींची विशेष ख्याती आहे. लालबागच्या राजाचं आणि भाविकांचं एक खास नातं आहे. लालबागच्या राजाच्या चरणी केला जाणारा नवस हा पूर्ण होतो, अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे लालबागच्या राजाची नवसाला पावणारा गणपती अशी देखील ख्याती आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.
राज्यभरात गौराईंचे उत्साहात आगमन
महाराष्ट्रात ठिकठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातोय. गौराईंचे देखील थाटामाटात आवाहन झाले आहे. घरोघरी या गौराईसाठी आरास करण्यात आली आहे. . हा उत्सव ज्येष्ठ गौरी आवाहनापासून सुरू होतो आणि तीन दिवस चालतो, त्यानंतर ज्येष्ठ गौरी पूजन होते आणि गौरी विसर्जनाने समाप्त होतो. गौरी पूजन किंवा ज्येष्ठ गौरी पूजन म्हणूनही ओळखले जाते, यंदा हा उत्सव 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2023 पर्यंत असणार आहे.