मुंबई : मुंबईतील गणपती विसर्जन संपन्न झालं आहे. गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. तब्बल 22 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. हा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी गणेशभक्तांनी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी केली होती. दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज पाणावलेल्या डोळ्यांनी आणि पुढच्या वर्षी लवकर या जयघोषासह बाप्पाला निरोप देण्यात आला.

अनंत अंबानी उपस्थित
विशेष म्हणजे लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानीही उपस्थित होते. बाप्पाला निरोप देण्यासाठी असलेल्या तराफ्यावर अनंत अंबानी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह हजर होते. बाप्पाचे विसर्जन होईपर्यंत ते तराफ्यावरच असल्याचं पाहायला मिळालं. तीन दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांनी कुटुंबासह लालबागच्या राजाच्या आरतीला हजेरी लावली होती.

दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन


तर दुसरीकडे पुण्यातील मानाच्या पाच गणपतींनंतर प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं आज सकाळी 8 वाजता महापालिकेच्या हौदात विसर्जन करण्यात आलं. लक्ष्मी रस्त्यावरुन रात्रभर दगडूशेठची मिरवणूक सुरु होती. विसर्जन सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी सकाळपर्यंत गर्दी केली होती.