Ganesh Visarjan 2022 : आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन (Ganeshotsav 2022)  अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे.  गणेशभक्तांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. यंदा पर्यावरणपूरक विसर्जनावर (Ganesh Visarjan)  भर दिला आहे. यासाठी कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन महानगरापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात  ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. यामध्ये शीव परिसरात असणा-या एन. एस. मंकीकर मार्गालगत सायन तलाव’ आहे.  प्रसिद्ध असणा-या तलावात दरवर्षी शीव, चुनाभट्टी इत्यादी नजिकच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी येत असतात. तथापि, तलावाची भौगोलिक वैशिष्ट्ये, परिस्थिती व तलावातील जलचर आदी बाबी लक्षात घेऊन यंदाच्या गणेशोत्सवापासून या तलावात मोठ्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करु नये, अशी विनंती ‘एफ उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. गजानन बेल्लाळे यांनी केली आहे.


यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान शीव, चुनाभट्टी इत्यादी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी व नागरिकांनी मोठ्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन 'सायन तलाव' येथे करु नये. या तलावात केवळ घरगुती श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनाची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच ही सुविधा रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. मोठ्या श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी पर्यायी विसर्जन स्थळ म्हणून मोठ्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन हे दादर चौपाटी व माहीम रेतीबंदर येथे करावे, असेही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ उत्तर’ विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.    


गणेशोत्सवावेळी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी 10,644 पोलीस तैनात


विसर्जनादरम्यान वाहने बंद पडून अथवा विसर्जनाच्या मार्गात अडथळा दूर करण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी पोलीस विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून लहान व मोठ्या क्रेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेश विसर्जन कालावधीमध्ये गणेश भक्तांना वैदयकीय सुविधा मिळण्यासाठी प्राथमिक उपचार केंद्रे उभी करण्यात येणार आहेत. आगामी गणेशोत्सवावेळी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी 10,644 पोलीस अधिकारी आणि अंमलदार, होमगार्ड, ट्राफिक वॉर्डन, नागरी संरक्षण दल, एन.एस.एस., आर. एस. पी. तैनात करण्यात आले आहेत. या कामात वाहतूक पोलिसांना मदत करण्याकरता वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटना उदा. वॉटर सेफ्टी पेट्रोल इत्यादी यांचा समावेश आहे.