Ganesh Chaturthi 2022 : गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. आज 31 ऑगस्ट... आज श्री गणेश चतुर्थी... (Ganesh Chaturthi) ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस अखेर उजाडला आहे. बाप्पाची आज विधिवत प्राणप्रतिष्ठा करुन दहा दिवसांच्या उत्साहपर्वाला (Ganesh Utsav 2022) प्रारंभ होत आहे. बाप्पाच्या आगमनाने घराघरात मंगलमय वातावरण आहे. पुढील दहा दिवस बाप्पाची सजावट, आरत्यांचे स्वर, गौराईचे आगमन, गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे. या निमित्तानं सरकारनं एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे.
राज्य शासनाने 31 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्यास 2 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मुनगंटीवार म्हणाले की, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यापूर्वी 30 ऑगस्ट 2022 पर्यंतची मुदत देण्यात आली होती,परंतु वाढता प्रतिसाद आणि मुदतवाढीची मागणी विचारात घेऊन सदर ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आता 2 सप्टेंबर करण्यात येत आहे.
राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख
राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख 50 हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास 25 हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे किंवा स्थानिक पोलिस स्थानक अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर what is new या शीर्षकावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विहित नमुन्यातील अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई मेल वर दिनांक 2 सप्टेंबर 2022 पर्यंत दाखल करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या