Mumbai Terror Attack Threats : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पुन्हा एकदा 26/11 प्रमाणे दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Crime Branch) तपासात हा आयपी अॅड्रेस (IP Addresses) पाकिस्तानचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. याआधी हा आयपी अॅड्रेस यूकेचा (UK)असल्याचे दिसत होते. हा संदेश पाठवणाऱ्याने प्रॉक्सी सर्व्हर वापरला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने मीडियाशी बोलताना स्वतःला निर्दोष सांगितले होते, आता त्या व्यक्तिचा गुन्हे शाखेला संशय आला आहे.


पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्या व्यक्तीने मीडियाशी बातचीत केल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या दहा जणांचे क्रमांक पाठवण्यात आले होते, त्यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. दरम्यान, नंबर का पाठवले गेले याचा पोलीस आता तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज आला होता. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला त्यांच्या हेल्पलाइन क्रमांकावर अनेक धमकीचे संदेश आले होते. त्यात असे म्हटले आहे की, सहा लोक मुंबईत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करणार आहेत. मुंबई शहर उडवून देण्याची तयारी सुरु असल्याचे त्या संदेशात म्हटलं होते.


काय होती धमकी ?


दरम्यान, या धमकीच्या संदेशात काही संशयितांचे फोटो आणि नंबरही शेअर करण्यात आले होते. याबाबत मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या नंबरवरून मुंबईवर 26/11 चा हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश पाठवण्यात आला आहे, त्याचा कोड पाकिस्तानचा आहे. संदेशांमध्ये 26/11 चा दहशतवादी अजमल कसाब आणि मारला गेलेला अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीचाही उल्लेख आहे. 2008 मध्ये मुंबईत 10 दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 160 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण जखमी झाले होते. मुंबईला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्यानं पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या धमकीचा तपास वेगाने सुरु करण्यात आला होता. तसेच मुंबईतली महत्त्वाच्या भागांत सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली होती. 


महत्त्वाच्या बातम्या: