मुंबई : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा कथित पीए गजानन पाटील 30 कोटीच्या लाचखोरी प्रकरणात गजाआड झाल्यानंतर, मोठी रंजक माहिती बाहेर येऊ लागली आहे.

 

"लाचलुचपत प्रतिबंध विभाग गेले 3 महिने गजानन पाटीलच्या मागावर होती. त्याचे रेकॉर्ड्स सरकारकडे उपलब्ध आहेत. या तपासात कुठलीही ढवळाढवळ होणार नाही" असं मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितलं.

 

एकनाथ खडसेंनी तक्रारदार रमेश जाधव यांना विकृत म्हणत गजानन पाटलाची पाठराखण केली होती. त्यामुळं एसीबीच्या कारवाईवर खडसे संशय कसा घेतात? असा सवाल विचारला जाऊ लागला.

 

काय आहे गजानन पाटील लाचखोरी प्रकरण?


राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा खासगी पीए असल्याचं सांगणाऱ्या गजमल पाटील उर्फ गजानन पाटील, याला 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात त्याला अटक केली.

 

ठाण्यातील मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थेला जमीन हस्तांतरित करण्यासठी गजानन पाटीलने संस्थेच्या विश्वस्तांकडे तब्बल 30 कोटींची लाच मागितली होती. यानंतर संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. त्यावर कारवाई करत एसीबीने गजानन पाटीलला मंत्रालयात अटक केली.

 

एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण

दरम्यान, “गजानन पाटील नावाची व्यक्ती माझ्या मुंबई किंवा जळगावातील कार्यालयात अधिकृत किंवा खासगीरित्या कोणत्याही पदावर कार्यरत नाही,” असं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी दिलं आहे. तसंच माझ्या नावाचा गैरवापर करत असून दोषींविरोधात कठोर कारवाई करावी,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, “गजानन पाटील हे मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी आहेत. ते अधूनमधून जळगाव जिल्ह्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत आणतात. तसंच तालुक्यातील रहिवासी असल्याने त्यांच्याशी ओळख आहे.”

संबंधित बातम्या


30 कोटींची लाच मागणाऱ्या खडसेंच्या कथित पीएला अटक


जमीन 5 कोटींची, लाच 30 कोटींची कशी?: एकनाथ खडसे