मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने  मुंबई उपनगरातील पाली हिलमध्ये एक फ्लॅट खरेदी केला आहे. उपनगरातील हा सर्वात महागडा फ्लॅट असल्याचं म्हटलं जात आहे. या फ्लॅटची किंमत 35 कोटी रुपये आहे.

 

रणबीरने 'वास्तू पाली हिल'च्या सातव्या मजल्यावर 2460 स्क्वेअर फूटचा फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटसह दोन पार्किंग स्लॉटही आहेत. कपूर्सच्या कृष्णा राज बंगल्याजवळच ही 12 मजली इमारत आहे.

 

उपनगरातील सर्वात महागडा फ्लॅट रणबीरचा

सुत्रांच्या माहितीनुसार, प्रति चौरस फुटाच्या हिशेबाने हा उपनगरातील सर्वात महागड फ्लॅट असू शकतो. मागील वर्षी उद्योजक जिंदाल घराण्याने दक्षिण मुंबईच्या अल्तमाऊंट रोडवर असलेल्या लोढा टॉवरमध्ये 1.60 लाख प्रति चौरस फूटच्या किंमतीने 10,000 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट खरेदी केला होता. तर वांद्र्यातील पेरी क्रॉस रोडवरील सोना व्हिला बिल्डिंगमध्ये 1600 स्क्वेअर फुटांच्या फ्लॅटसाठी बिल्डर जगदीश यांनी एका चौरस फुटाला 1 लाख रुपये मोजले होते. हा मुंबई उपनगरातील सर्वात महाग फ्लॅट होता. मात्र आता  2460 स्क्वेअर फुटांच्या फ्लॅटसाठी रणबीर कपूरने एका चौरस फुटाला 1.42 लाख रुपये दिले आहेत.

 

 

बॉलिवूड कलाकारांचं प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीला प्राधान्य

बॉलिवूड कलाकार प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक अतिशय सुरक्षित पर्याय मानतात. मागील वर्षी अक्षय कुमारने वरळी आणि आमीर खानने पाली हिलमध्ये अपार्टमेंट खरेदी केलं होतं. प्रॉपर्टी मार्केटच्या सुत्रांच्या माहितीनुसार, फिल्म इंडस्ट्रीतील लोक प्रॉपर्टी खरेदी करताना फूल चेक पेमेंट करतात. अक्षय कुमारने स्कायलार्क टॉवरच्या 39च्या मजल्यावरील लक्झरी अपार्टमेंटसाठी 28 कोटी मोजले होते.