FYJC Admission 2021 : अकरावी प्रवेशासाठी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या सीईटी संदर्भातील संभ्रम आज दूर होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर आज निर्णय होणार आहे. अकरावीसाठीची सीईटी एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्यानं आयसीएससी बोर्डाच्या एका विद्यार्थ्यीनीनं त्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज दुपारी अडीच वाजता या निकालाचं वाचन केलं जाणार आहे. 


न्यायमूर्ती आर.डी धनुका आणि रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी करण्यात आली होती. राज्य सरकारनं या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली होती. एसएससी बोर्ड हे राज्य सरकारच्या अंतर्गत येणारं बोर्ड आहे. यामध्ये विद्यार्थांना अकरावीसाठी कशाप्रकारे प्रवेश द्यायचा, ही भूमिका राज्य सरकार ठरवेल, जर राज्या बाहेरील बोर्डांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हायचं असेल, तर तुम्हाला राज्य सरकारनं तयार केलेल्या आराखड्यानुसारच यावं लागेल. ज्यावेळी राज्याचे विद्यार्थी आयआयटी किंवा तस्सम परीक्षांची तयारी करतात, तेव्हा ते दुसऱ्या बोर्डांच्या परीक्षांचीही तयारी करतात. त्यामुळे इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना आमच्या बोर्डाप्रमाणे तयारी करण्यास काय हरकत आहे? अशी भूमिका राज्य सरकारनं सुनावणी दरम्यान मांडली होती.  


राज्य सरकारनं अकरावी प्रवेशाबाबत 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्याची मागणी करत अनन्या पत्की या विद्यार्थिनीनं ही याचिका आपले वडील योगेश पत्की यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर गुरूवारी न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राज्य सरकारनं दहावीची परीक्षा रद्द झाल्यानं अकरावी प्रवेशासाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट (सीईटी) घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. दहावीचं मुल्यांकन कसं केलं जाईल याचा फॉर्म्युलाही जाहीर करण्यात आलाय. मात्र तरीही साल 2020-21 च्या शैक्षणिक वर्षावर आधारीत अंतर्गत मुल्यांकनावर असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी घेतली जाईल आणि सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य दिलं जाईल, असंही या परिपत्रकात म्हटलेलं आहे.


ICSE, CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल लागला असला तरी अकरावी सीईटी परीक्षेच्या तयारीबाबत आयसीएसई, सीबीएसई बोर्डाचे हजारो विद्यार्थी अजूनही संभ्रमात आहे. आता कोर्टाच्या निर्णयाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.  12 दिवसात वेगळा सीईटी अभ्यासक्रम असताना अभ्यास कसा करायचा? असा प्रश्न सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसमोर उपस्थित आहे. अशातच अकरावी सीईटी परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबतचा तिढा आज म्हणजेच, 10 ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयनंतर सुटणार आहे. मात्र, परीक्षा अवघ्या 12 दिवसांवर असताना एसएससी बोर्ड सोडून इतर विद्यार्थी परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत अजूनही संभ्रमात आहेत. सीईटी परीक्षा ही पूर्णपणे एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असताना इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम वेगळा असल्याने परीक्षेची तयारी करणे कठीण जातं आहे.शिवाय, सीईटी परीक्षेसाठी असलेल्या विषयामध्ये काही विषयांचा अभ्यासच विद्यार्थ्यांनी केलेला नाही. कारण इतिहास, भूगोल सारखे विषयच त्याना अभ्यासाला नव्हते.


दरम्यान, आतापर्यंत साडेदहा लाख विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज केला आहे त्यात 36 हजार विद्यार्थी हे इतर बोर्डाचे आहेत. त्यामुळे आम्ही ज्या बोर्डाचा अभ्यास केला त्यावर आधारीत सीईटी परीक्षेचा पेपर असावा, अशी मागणी केली जात आहे.  यावर आता अंतिम निकाल 10 ऑगस्टला जरी येणार असला तरी विद्यार्थ्यांना तयारीसाठी खूपच कमी वेळ असल्याचा विद्यार्थी सांगत आहेत.