मुंबई : फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे वसई पूर्वेकडील खान कंपाऊंड येथील अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. अशा मुलांसाठी आलिया मिलिंद पवार या तृतीयपंथी पुढे आल्या आहेत. मुलांना त्या मोफत शिक्षण देत आहेत. बीएससी मायक्रोबायोलॉजी उत्तीर्ण झालेल्या आलिया मिलिंद पवार या आपल्या शिक्षणाचा उपयोग करून शिक्षणापासून वंचित असलेल्या या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत.


वसई पूर्वेतील रहिवाशी असलेल्या आलिया पवार यांनी गरीब मुलांसाठी मोफत शिकवणी सुरु केली आहे. आलिया यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली अर्बन महाविद्यालयात आपले बीएससी मायक्रोबायोलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आपल्याला योग्य नोकरी भेटेल अशी आशा मनाशी बाळगून कित्येक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. परंतु,प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पदरी निराशाच पडली. 


डोक्यावर आईची जबाबदारी असल्याने भीक मागून आणि लोकांना आशीर्वाद देऊन त्या आपला उदरनिर्वाह करतात. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोना काळानंतर त्यांच्या परिसरातील तब्बल 50 ते 60 मुले शिक्षणापासून वंचित होत चालली असल्याने आपल्या शिक्षणाचा योग्य उपयोग करून या विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांपासून त्या मोफत शिक्षण देत आहेत.


शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी त्यांनी त्यांच्यासोबत खेळायला सुरुवात केली. दोन ते तीन मुलांपासून सुरुवात केल्यानंतर आज त्या दोन सत्रांत झोपडपट्टीतील सुमारे 30 ते 40 मुलांना मोफत शिकवणी देत आहेत. 


खान कंपाऊंडमधील बहुतेक लोक हे दैनंदिन रोजगारावर आपले जीवन जगत आहेत. कोरोनापासून  हातून रोजगार गेल्यानंतर अनेकांनी आपल्या मुलांचे शिक्षण बंद केले. महिन्याला जेमतेम 8 ते 10 हजार उत्पन्न असलेल्या पालकांना आपल्या पाल्याची फी भरणे देखील कठीण झाले. त्यामुळे अनेकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठवणे पसंत केले. मात्र त्यांच्या या परिस्थितीचा विचार करून आलिया यांनी या भागातील मुलांचे भविष्य उज्वल करण्याकडे कल दिला आहे.
 
आलिया यांच्या या कार्यामुळे परिसरातील मुलांना आता शिक्षणाची ओढ लागली आहे. त्यामुळे या परिसरात प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करावी अशी मागणी देखील आता करण्यात येते आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. पण देशातील उद्याचे भविष्य असणाऱ्या मुलांना आजही शिक्षणासाठी वणवण करावी लागते ही मोठी शोकांतिका आहे.