मुंबई : कांदिवलीतील दामू नगरमध्ये कपड्यांच्या गोदामाला रविवारी भीषण आग लागली होती. या आगीत चौघांचा मृत्यू झाल्याचं आज समोर आलं आहे. आग विझल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना याठिकाणी चौघांचे मृतदेह सापडले आहेत.


कापड गोदामांना लागलेली ही आग 4 फायर इंजिन आणि 4 वॉटर टँकरच्या सहाय्यानं विझवण्यात आली होती. त्यावेळी जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली होती. मात्र आग विझल्यानंतर अग्निशमन दलाला जवानांना चार मृतदेह सापडले आहेत.


राजू विश्वकर्मा, राजेश विश्वकर्मा, भावेश पारेख आणि सुदामा लल्लनसिंह अशी मृतांची नावे आहेत.


त्यामुळे कालचा दिवस पुन्हा एकदा मुंबईत अग्नितांडवाचा ठरला. काल सकाळी खाररोडवर असलेल्या न्यू ब्युटी सलूनला आग लागली होती. ही आग दीड तासानंतर आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाली नाही.


त्यानंतर मध्यरात्री मालवणी भागातील हँडीक्राफ्ट गोदामाला आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोदाम जळून खाक झालं. त्यामुळे मुंबईतील कामगार रुग्णलायला लागलेल्या आगीनंतरसुद्धा आगीच्या घटना कमी होत नसल्याचं चित्र रविवारच्या दिवशी पाहायला मिळालं.