भिवंडी : राज्यभर खड्ड्यांची समस्या तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी विविध प्रकारची आंदोलनं करुन खड्ड्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न नागरिक करत आहेत. भिवंडीतील नागरिकांनी अत्यंत हटके आंदोलन करुन प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे.
भिवंडी शहरातील विविध रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावर इलाज म्हणून शहरातील भिवंडीकर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी विविध वाहनातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना वेदनाशमक गोळ्यांचे वाटप करुन प्रवाशांना दिलासा दिला आहे.
तसेच, शहरातील अनेक खड्डे बुजवण्याचा प्रयत्न देखील भिवंडीकर संघर्ष समितीने केला आहे. या अनोख्या आंदोलनाने पालिका प्रशासनाचा पोलखोल केला आहे.
भिवंडी शहरामध्ये रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. या रस्त्यांवरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, वाहनांमधून प्रवास करताना शारीरिक व्याधींचा त्रास होत आहे.
नागरिकांना शारीरिक व्याधीतून मुक्तता व्हावी यासाठी भिवंडीकर संघर्ष समितीचे प्रमुख सुहास बोंडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध रस्त्यांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना वेदनाशमक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाचे नागरिकांनी स्वागत केले असून रस्त्यांच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या पालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला.