मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेचा भडका उडणार आहे, असे भाकित माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वर्तवले. अजित पवार यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली.

“शिवसेना संभ्रमावस्थेत आहे. त्यांना काय करायचं हेच कळत नाही. पण त्यांची खूप अवहेलना केली जातेय. मंत्री आणि आमदार नाराज आहेत, असे अजित पवार म्हणाले.

राहुल गांधींच्या गळाभेटीची पाठराखण

“राहुल गांधींनी बाकावर बसून जे (डोळे मिचकावणे) केलं, ते करायला नको होतं, तिथे थोडी गडबड झाली. त्याच्यात गांभीर्य नसल्याची टीका सुरु झाली.तसेच, राहुल गांधींनी गळाभेट घेतली, त्यात काय चुकीचं? मोदी परदेशात अनेकांच्या गळाभेट घेतात.” असे अजित पवार म्हणाले.

मुंबईत मार्गदर्शन शिबिरात कार्यकर्त्यांना खडे बोल

एकमेकांची उणी-दुणी काढू नका. घरात भांड्याला भांडं लागतं. मात्र एवढं भांडं वाजू नये की, प्रत्येकाला आवाज जाईल, असे कार्यकर्त्यांना सांगत अजित पवार पुढे म्हणाले, “प्रत्येकाला मान-सन्मान देत चला. तो पुढे गोला, तर माझं कस व्हायचं? असा विचार करु नका. चार दिवस सासूचे असतात, तर चार दिवस सुनेचे असतात. आणि सुनेने सुद्धा चांगले दिवस आल्यावर सासू जशी वागली तसे वागू नये”

अनेक कार्यकर्ते म्हणतात की आम्हला कुणी ओळखतच नाही.  राष्ट्रवादी काँग्रेस हीच तुमची ओळख आहे. काही कार्यकर्ते पद मिळाल्यानंतर स्वतःची आर्थिक पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. आमच्यापर्यंत नंतर हे प्रकार समोर येतात. अशा प्रकारांमुळे पक्ष बदनाम होतो, असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

दरम्यान, मुंबईमध्ये पक्षात आता नवीन चेहऱ्याला संधी मिळलायला पाहिजे. जुने चेहरे मार्गदर्शन करायला नक्कीच सोबत राहतील, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.


संबंधित बातमी : आरक्षण संपवण्याचा डाव, तो हाणून पाडा : भुजबळ