विरार : विरारमधील मांडवी येथील उसगावमध्ये चक्क आंब्यांसाठी एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उसगांव येथे लक्ष्मी फार्म हाऊसवर जंगी राजभर या रखवालदारचा मृतदेह काही दिवसांपूर्वी आढळून आला होता. याप्रकरणी विरार पोलिसांनी काल चार आरोपींना अटक केली. त्यानंतर या हत्येचं गूढ उकललं.

आंबे चोरण्यास आलेल्या चारही आरोपींनी 65 वर्षीय जंगी राजभर या रखवालदाराने हटकल्याने त्यांनी दगडी पाट्याने ठेचून राजभर याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह चटईत बांधून बाजूच्याच नदीमध्ये टाकून आरोपी फरार झाले होते.

याप्रकरणी पोलिसांनी विनोद महादू बसवंत, विलास यशवंत जाधव, राजेश काळूराम बसवंत आणि संतोष काळूराम पडवळे या चार आरोपींना अटक केली आहे.

29 मार्च रोजी चारही आरोपींनी आंबे चोरायचा प्लॅन केला होता. ठरल्याप्रमाणे ते रात्रीच्या वेळी आंबे चोरण्यासाठी आले त्याचवेळी  रखवालदार राजभर यांनी त्यांच्या तोंडावर बॅटरी मारली. आपण पकडले जाऊ या भीतीपोटी आरोपींनी तेथील एक दगडी पाटा उचलून राखणदार राजभर यांच्या डोक्यात घालून त्याची हत्या केली.

1 एप्रिल रोजी राजभरचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.