मुंबई : मुंबईतील गिरणगावमधील 95 वर्षे जुन्या असणाऱ्या ब्रिटीशकालीन बीडीडी चाळी आता इतिहासजमा होणार आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. बीडीडी चाळीची एकेकाळी श्रमिकांची कर्मभूमी म्हणून ओळख होती.
सुमारे 95 वर्षे जुन्या बीबीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचं येत्या 22 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी अवघ्या अडीच वर्षांतच मार्गी लावला.
जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा हा देशातील पहिला प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत बीडीडी चाळीत 160 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्यांना 500 चौरस फुटांची घरं मोफत मिळणार आहेत.
डिलाईन रोड, वरळी, नायगाव, शिवडी येथे ब्रिटीशकालीन 207 चाळी आहेत. त्यातील 194 चाळींच्या पुर्नविकासाचं भूमिपूजन 22 एप्रिलला होणार आहे.
1921 ते 1925 या कालावधीत या इमारती बांधण्यात आल्या आहेत. म्हणजेच बीडीडी चाळीने नव्वदी पार केली आहे. त्यामुळे अर्थातच बांधकामं जर्जर झालं आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची मागणीने जोर धरला होता.