कल्याण (ठाणे) : 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा नाकारुन रुग्णाची गैरसोय केल्याप्रकरणी कल्याण येथील फोर्टीज हॉस्पिटलला जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशाप्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. आरोग्य सेवा संचालनालय तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा स्वीकारण्याबाबत जिल्ह्यातील सर्वच खाजगी रुग्णालयांना रुग्णांची गैरसोय होऊ नये, याबाबत सूचना दिल्या होत्या, तसेच आवाहनही केले होते.
भिवंडीचे रतिलाल शहा या रुग्णाच्या 1 लाख 70 हजार 118 इतक्या रकमेच्या बिलासाठी नोटा स्वीकारण्यास या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने, त्यांचा मुलगा मितेश शहा यांची मोठी अडचण झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात त्यांचाकडे तक्रार आल्यानंतर तातडीने उपविभागीय अधिकारी प्रसाद उकार्डे व इतर महसूल कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णास मदत करण्याचा सुचना दिल्या. त्याप्रमाणे उकार्डे यांनी हॉस्पीटलचे संचालक कुलकर्णी यांची भेट घेऊन रुग्णांची गैरसोय होऊ नये, अशी समज दिली.
यावेळी रुग्णालयातर्फे या रुग्णास त्रास होणार नाही, असे आश्वस्त करण्यात आले. पण रात्री उशिराने आणखीही काही रुग्णांनी हेल्प डेस्कवर तक्रार करून संबंधित रुग्णालय विशिष्ट चलनाचीच मागणी करीत असल्याच्या तक्रारी केल्या. याची दखल घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा भंग निर्माण होण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते असे वाटून उपविभागीय अधिकारी कार्यालयाने या रुग्णालयास नोटीस दिली.
भारतीय दंड विधान संहिता कलम 188 अन्वये तसेच बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा 1949 मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी यांच्याकडे कारवाई का करण्यात येऊ नये असे या नोटिशीत म्हटले असून उद्या (12 नोव्हेंबर) पर्यंत रुग्णालयाचा खुलासा न आल्यास कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असेही यात म्हटले आहे.