मुंबई : मुंबईचे माजी नगरपाल आणि जायंटस् इंटरनॅशनल या जागतिक स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक नाना चुडासामा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मुंबईतील चर्चगेट येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांचे ते वडील होते.

नाना चुडासमा यांच्या निधनाने मुंबईच्या सामाजिक - सांस्कृतिक विकासाचा ध्यास असणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुडासमा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, "नाना चुडासामा हे मुंबईच्या समाजजीवनाशी खऱ्या अर्थाने एकरूप झाले होते. विविध संस्था, संघटना आणि उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी या महानगराच्या विकासासाठी निष्ठेने केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. विशेषतः मुंबईच्या नगरपाल पदाला त्यांनी कृतीशीलतेचा आयाम दिला."

"जायंटस्‌ इंटरनॅशनलसारख्या संस्थेच्या रुपाने समाजसेवेसाठी एक व्यापक व्यासपीठ उभारण्यासाठी चुडासमा यांनी केलेली धडपड त्यांच्या सामाजिक बांधिलकीची प्रचीती देणारी होती. देशातील विविध चर्चित विषयांवर दोन ओळींमध्ये नियमित आणि मार्मिक भाष्य करणारे नानांचे मरिन ड्राइव्ह येथील बॅनर हे त्यांच्यातील परखड भाष्यकाराची प्रचीती देणारे होते." असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.