कल्याण : महाराष्ट्रात बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहीबाई पोपेरे यांना अखेर हक्काचं घर मिळणार आहे. 'माझा कट्टा'वर राहीबाईंनी त्यांची व्यथा मांडल्यानंतर त्यांच्यासाठी मदतीचे हात पुढे आले आहेत.
राहीबाईंची मुलाखत 'माझा कट्टा'वर पाहिल्यानंतर अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्वतःहून पुढे येऊन राहीबाईंना घर बांधून देण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी येत्या 29 डिसेंबर रोजी अंबरनाथमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची एक टीम नगर जिल्ह्यात जाऊन राहीबाई यांची भेट घेणार आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्यांची ही टीम राहीबाईंच्या घराच्या जागेची पाहणी करणार आहे. त्यानंतर 4 जानेवारी रोजी अंबरनाथमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राहीबाई यांना मदत सुपूर्द करण्याचा मानस असल्याचं अरविंद वाळेकर यांनी सांगितलं आहे.