मुंबई : काँग्रेसने माजी खासदार प्रिया दत्त यांना अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या (एआयसीसी) सचिव पदावरुन हटवलं आहे. काँग्रेस सरचिटणीस अशोक गहलोत यांनी प्रिया दत्त यांनी पत्र लिहून ही माहिती दिली. मात्र सचिव पदावरुन हटवण्याच्या कारणांचा पत्रात उल्लेख केलेला नाही. महत्त्वाचं म्हणजे अशोक गहलोत यांनी 26 सप्टेंबर रोजीच पत्र पाठवून त्यांना सचिव पदावरुन हटवल्याचं कळवलं होतं.

"काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तुमच्या अथक मेहनत आणि पक्षाच्या सचिव पदासाठी प्रशंसा करतात. पक्ष तुमच्या सेवेचा भविष्यात वापर करेल. सचिव असताना पक्षासाठी वेळ देण्यासाठी तुमचे आभार," असं अशोक गहलोत यांनी पत्रात लिहिलं आहे.

दरम्यान, काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी एक बैठक पार पडली. यावेळी निरुपम यांनी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील लोकसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून प्रिया दत्त यांच्या नावाची घोषणा केली. मात्र ही घोषणा होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध करत गोंधळ घातला. प्रिया दत्त यांच्याविरोधात घोषणाबाजी करत निरुपम यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला. 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्या मतदारसंघात फिरकल्याच नाही. तरीही त्यांच्या नावाची घोषणा का करता, असा सवाल करत कार्यकर्त्यांनी निरुपम यांचा मार्ग रोखून धरला होता.

वडील सुनील दत्त यांच्या निधनानंतर प्रिया दत्त काँग्रेसमध्ये सामील झाल्या होत्या. 2005 मध्ये पहिल्यांदा खासदार बनल्या होत्या. यानंतर 2009 मध्ये उत्तर मध्य मुंबईतील लोकसभा मतदारसंघातून त्यांचा विजय झाला होता. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा भाजपच्या पूनम महाजन यांच्याकडून पराभव झाला होता.