मुंबई : माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे खासदार कुमार केतकरही उपस्थित होते.


अभय ठिपसे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक खटल्यात अनियमितता दिसत असून आरोपमुक्त करण्यात आलेल्या आरोपींवर फेरविचार करायला हवा, असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत आलं होतं.

राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज भिवंडी येथील कोर्टात हजेरी लावली. त्यानंतर गोरेगावमध्ये काँग्रेसच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधितही केलं. त्यानंतर राहुल गांधी यांच्या उपस्थितीत अभय ठिपसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सध्याच्या वातावरणात देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. धर्मनिरपेक्ष पक्षाची ओळख असलेल्या काँग्रेसमधून परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ठिपसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना सांगितलं.

कोण आहेत अभय ठिपसे?

अभय ठिपसे हे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. त्यांनी सलमान खानची हिट अँड रन केस, बेस्ट बेकरी केस, साध्वी प्रज्ञा केस यांसारखी अनेक प्रकरणे न्यायमूर्ती असताना हाताळली आहेत. शिवाय काही दिवसांपूर्वी सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणी अनियमितता दिसत असल्याचा आरोप केला होता.

सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यात बड्या आरोपींना मुक्त केलं जात असून हे चिंताजनक आहे. याप्रकरणी फेरतपासणीची गरज निर्माण झाली आहे. वरिष्ठ न्यायालयाने आरोपींना मुक्त करण्याचे जे आदेश देण्यात आले ते पुन्हा तपासावे आणि ते योग्य आहेत की नाही याची शहानिशा करावी, असं अभय ठिपसे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले होते.