मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत कसे तरी वाचले, कर्नाटकात हरले, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिसणारही नाहीत, असं थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला दिलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणार असल्याचंही ते म्हणाले.


मुंबईतील गोरेगावमध्ये बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. भिवंडी कोर्टातील सुनावणीसाठी राहुल गांधी आले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली.

''मोदी अडवाणींना विसरले''

मोदी ज्या लालकृष्ण अडवाणींना गुरु मानायचे, त्यांनाच ते आज आदर देत नाहीत, याबद्दल आपल्याला वाईट वाटतं, असं राहुल गांधी म्हणाले. 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत आम्ही अडवाणींना हरवलं. संसदेतील कार्यक्रमात मी अडवाणींच्या सन्मानाचं रक्षण करतो, त्यांना पुढे उभे करतो, असं राहुल गांधी म्हणाले.

आपल्या धर्मात गुरु सगळ्यात मोठा असतो. आपण त्यांना मान देतो. नरेंद्र मोदी यांचे गुरु एल. के. अडवाणी आहेत, पण त्यांचा जाहीर कार्यक्रमांमध्ये सन्मान राखण्याचं काम काँग्रेस पक्ष करतो, कारण आमचा तो धर्म आहे, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला.

आम्ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींविरोधात लढलो. पण काल रुग्णालयात भेटायला पहिला मी गेलो, कारण हा काँग्रेसचा धर्म आहे, इतिहास आहे, असंही राहुल गांधींनी सांगितलं.

सावरकर जेव्हा माफी मागत होते, हात जोडून सांगत होते माफ करा, तेव्हा काँग्रेसचे नेते तुरुंगात खितपत पडले होते, 15 ते 20 वर्षांची शिक्षा भोगत होते. आमच्या कार्यकर्त्यांनी बलिदान दिले, असं राहुल गांधी म्हणाले.

भिवंडी कोर्टात नेमकं काय झालं?

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मात्र राहुल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचा दावा कोर्टात केला.

महात्मा गांधीजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी 6 मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत केलं होतं. या वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहर कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.

त्यावर आज सुनावणी झाली आणि राहुल गांधींवर आरोप निश्चित झाले. या प्रकरणावर येत्या 10 ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार आहे. यावेळी राहुल यांच्यासोबत काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत उपस्थित होते.