मुंबई : मद्यप्रेमींच्या खिशावर ताण आणणारी बातमी आहे. विदेशी दारु 18 ते 20 टक्क्यांनी महागली आहे. विदेशी दारुच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, त्यामुळे ही किंमत वाढली आहे.


वाढीव नवीन दर 1 जानेवारीपासून लागू झाले आहेत. विदेशी दारुच्या या दरवाढीमुळे राज्य सरकारच्या महसुलात 500 कोटी रुपयांची भर पडणार आहे.


जानेवारी 2013 पासून वाईन आणि बिअर यांच्या उत्पादन शुल्कात दरवर्षी वाढ करण्यात येत आहे. मात्र विदेशी दारुच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते.


विदेशी दारुवरील उत्पादन शुल्क करातून जवळपास 7 हजार कोटींची सरकारी तिजोरीत जमा होतात. उत्पादन शुल्क दरवाढीनंतर यामध्ये 500 कोटींची भर पडणार आहे. पेट्रोल, डिझेल यांच्या दरात केलेली कपात भरुन काढण्यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.