मुंबई : 2018 च्या शेवटच्या रात्री बाराचं ठोका पडला आणि सगळा आसमंत फटाक्याच्या रोषणाईने उजळून निघाला. सरलेल्या वर्षाला निरोप देत नवीन स्वप्ने आणि आव्हाने घेऊन येणाऱ्या नववर्षाचे मध्यरात्री जल्लोषात स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह संपूर्ण देशात उत्साह पाहायला मिळाला. मुंबईच्या मरीन ड्राईव्हला संध्याकाळपासूनच लोकांनी गर्दी केली होती. दरवर्षी प्रमाणे यंदाही मरीन ड्राईव्ह लोकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. अगदी उत्साहाच्या भरात मुंबईकरांनी सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्षाचं स्वागत केलं.
गेट ऑफ इंडियावर विद्युत रोषणाई
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भारताचं प्रवेशद्वार असलेल्या मुंबईतील गेट ऑफ इंडियावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या रोषणाईमुळे गेट वे अतिशय आकर्षक दिसत होतं. तर गेट वे शेजारील ताज हॉटेलच्या इमारतही रोषणाईने उजळली होती. याशिवाय सीएसएमटी स्थानकावरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.
सिद्धीविनायक मंदिरात भक्तांची मांदियाळी
मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरातही भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. नववर्षाच्या सुरुवातीला आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रात्री पासूनचं भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली. नववर्षाच्या पहिल्या काकड आरतीसाठी अनेक ठिकाणांहून भाविक या ठिकाणी येत असतात. सिद्धीविनायकचं दर्शन घेत अनेकांनी आपल्या नव्यावर्षाची सुरुवात केली.
भाविकांची सकाळपासूनच शिर्डीत गर्दी
सकाळपासूनच शिर्डीत भाविकांनी गर्दी केली होती. देशभरातून साई भक्तांसह परदेशातील साईभक्तांनी साई नगरीत नवर्षाचं स्वागतं केलं. भक्तांच्या सोईसाठी मंदीर रात्र भर खुलं ठेवण्यात आलं होतं. तर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दरवर्षी प्रमाणे शिर्डीत हजेरी लावत नववर्षाची सुरुवात केली. विरोधीपक्ष नेते राधकृष्ण विखे पाटील यांनीही शिर्डीच्या साईं समाधीचं दर्शन घेतलं.
शेगावमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक दाखल
दरम्यान विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले. श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने भाविक आल्याने भक्त निवास, लॉजेसदेखील हाऊसफुल्ल झाले आहेत.
धुळ्यात रक्तदान करून नववर्षाचे स्वागत
धुळ्यात रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. धुळे शहरातील युवक बिरादरी तसेच रक्ताश्रय संस्था यांच्या वतीनं नवीन वर्षाचं स्वागत रक्तदान करून करण्याचं हे 34 वे वर्ष आहे. या रक्तदानावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे उपस्थित होते. या रक्तदानाला युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
ठाणेकरांकडून नवीन वर्षाचा जल्लोष
दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणेकरांनी मासुंदा तलाव येथे एकत्रित येत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी 12 वाजण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या ठाणेकरांनी बरोबर बारा वाजताच आकाशात फुगे सोडून फटाक्यांच्या आतिषबाजीत नवीन वर्षाचे स्वागत करत एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
बीडमध्ये व्यसनमुक्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
बीडमध्ये व्यसनमुक्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा लोकविकास मंच सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन आणि कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठाणच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसंग्राम संघटनेच्या वतीने व्यसनमुक्त बीड हा उपक्रम राबवला गेला. तर संगीत रजनी कार्यक्रमामध्ये अभिनेत्री सांस्कृती बालगुडे, स्मिता तांबे, माधवी कुलकर्णी, मीरा जोशी, गायिका कविता पौडवाल, वैशाली माडे, अभिनेता अभिजीत केळकर, गायक ऋषिकेश रानडे, कौस्तुभ गायकवाड, हास्य कलाकार कमलाकर सातपुते, अरुन कदम यांनी बीडकरांचे मनोरंजन केले.
गोव्यात गाण्यांच्या तालावर तरुणाई थिरकली
सेलिब्रेशनसाठी हक्काचं आणि आवडतं ठिकाण म्हणजे गोवा. सरत्या वर्षाला निरोप देताना गोव्यात हरियाणातली प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीनं आपल्या नृत्यानं तर प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांनी आपल्या गायिकीनं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. गोव्यात बॉलिवूड गाण्यांच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसून आली. अनेक ठिकाणी परदेशी कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं.
विदेशातही नवीन वर्षाचं हर्षोल्हासात स्वागत
विदेशातही नवीन वर्षाचं अगदी हर्षोल्हासात स्वागत करण्यात आलं. नवीन वर्षाचं सर्वात पहिलं स्वागत न्यूझीलंडमध्ये उत्साहात झालं. ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य रोशनाई आणि आतषबाजी करून 2019 चं स्वागत करण्यात आलं. स्काय टॉवरवर लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळामध्ये रात्री बारा वाजल्यानंतर तुफान आतषबाजीला सुरुवात झाली, सर्वात पहिल्या नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी न्यूझीलंडमध्ये धाव घेतली. न्यूझीलंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियातील सिडनीत देखील नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर आणि ऑपेरा हाऊस परिससरात नववर्षानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. तिकडे दक्षिण कोरियाच्या सीओई एक्स मॉलबाहेर लेझर शो चा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर जोरदार आतषबाजीनं नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. त्यामागोमाग हाँगकाँगच्या व्हिक्टोरिया हार्बरवरही आतषबाजीनं 2019 चं स्वागत करण्यात आलं.
वेलकम 2019... देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 2019 07:21 AM (IST)
2018 च्या शेवटच्या रात्री बाराचं ठोका पडला आणि सगळा आसमंत फटाक्याच्या रोषणाईने उजळून निघाला. सरलेल्या वर्षाला निरोप देत नवीन स्वप्ने आणि आव्हाने घेऊन येणाऱ्या नववर्षाचे मध्यरात्री जल्लोषात स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह संपूर्ण देशात उत्साह पाहायला मिळाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -