मुंबई : मुंबईच्या साकीनाका विभागात दोन अल्पवयीन मुलानी 10 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या केल्याचे घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी या दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. शारीख शहाआलम चौधरी असे या मयत मुलाचे नाव आहे. एका सुटकेसमध्ये त्याचा मृतदेह भरून ती सुटकेस नाल्यात फेकून दिली असल्याची माहिती या अल्पवयीन आरोपींना पोलिसांना दिली होती. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सफेद पूल विभागातील नाल्यात त्याचा मृतदेह सापडला.


साकीनाका विभागात असलेल्या लालबहादूर शास्त्रीनगरमध्ये शारीख शहाआलम चौधरी हा दहा वर्षाचा मुलगा राहत होता. 20 डिसेंबरला संध्याकाळी ट्यूशनसाठी गेला तो परत आलाच नाही. त्याच्या पालकांनी साकीनाका पोलिसांत याची तक्रार दिली. पोलिसांनी या परिसरातील लोकांकडे तसेच सीसीटीव्हीद्वारे तपास करून या मुलाचा शोध घेतला.

याचवेळी शारीखच्या वडिलांना आलेल्या पाच लाखांच्या खंडणीच्या फोन वरून साकीनाका पोलिसांनी याच विभागातील 16 आणि 15 वर्षाच्या मुलांना ताब्यात घेतलं. आपण त्या मुलाची हत्या केली असून त्याचा मृतदेह एक नाल्यात टाकल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पोलिसांना सफेद पूल येथील नाल्यात त्याचा मृतदेह सापडला.

पोलिसांनी मोबाईलच्या लोकेशन आणि कॉलवरून सर्व तपासणी केली.  मिळालेल्या माहितीनुसार शारीखचे अपहरण केल्यावर जवळपास 1 तास मृतदेह असलेली सुटकेस घेऊन आरोपी फिरत होते. त्यानंतर आरोपींनी शारीखच्या वडिलांसोबत 1 तास घालवला आणि खानपान सुद्धा केलं. मी तुमच्या मुलाला शोधून देतो असेही सांगितले.