बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर पाच जणांना अंधत्व?
एबीपी माझा वेब टीम | 25 Jan 2019 05:32 PM (IST)
जोगेश्वरीत असलेल्या मुंबई महापालिकेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सात जणांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली होती. यापैकी पाच रुग्णांची दृष्टी गेल्याचा गंभीर आरोप भाजप नगरसेवक अभिजीत सामंतांनी स्थायी समितीत केला आहे.
मुंबई : मुंबईतील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये भोंगळ कारभार असल्याचा आरोप भाजप नगरसेवकाने केला आहे. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या पाच रुग्णांची दृष्टी गेल्याचा आरोप नगरसेवक अभिजीत सामंत यांनी केला आहे. जोगेश्वरीत असलेल्या मुंबई महापालिकेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सात जणांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली होती. यापैकी पाच रुग्णांची दृष्टी गेल्याचा गंभीर आरोप सामंतांनी स्थायी समितीत केला आहे. शस्त्रक्रिया विभागातील अस्वच्छतेमुळे जंतुसंसर्ग होऊन दृष्टी गेल्याचा आरोप केला जात आहे. ऑपरेशन थिएटर रोज साफ करण्याची गरज असताना इथे दोन आठवड्यातून एकदाच स्वच्छता होत असल्याचा दावाही सामंतांनी केला. नगरसेवक अभिजीत सामंत चार जानेवारीला सात जणांवर शस्त्रक्रिया झाली होती. जंतुसंसर्ग झाल्यानंतर सर्व रुग्णांना सहा जानेवारीला केईएम रुग्णालयात दाखल केले. तरीही रुग्णांची दृष्टी वाचवण्यात अपयश आले. फातिमाबी शेख, रत्नमा सन्याशी, रफिक खान, गौतम गव्हाणे आणि संगिता राजभर या रुग्णांची दृष्टी गेल्याचा आरोप आहे.