मुंबई : दहा वर्ष जुनी मैत्री... त्यानंतर फुललेलं प्रेम आणि आता विवाहबंधन! हे लग्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या एकुलत्या एक मुलाचं... म्हणजेच अमित ठाकरेंचं! त्यासाठी नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असलेलं 'कृष्णकुंज' रोषणाईने उजळून निघालंय. 27 जानेवारीला अमित ठाकरे मैत्रिण मिताली बोरुडेसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत.


कॉलेजमध्ये असतानाच अमित-मिताली एकमेकांच्या प्रेमात पडले. अमित ठाकरे मुंबईच्या पोदार कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेत होते, तर मिताली ही पोदार कॉलेजच्या शेजारील रुईया कॉलेजमध्ये कला शाखेची विद्यार्थिनी होती. काही ओळखीच्या मित्रांमुळे दोघांची कॉलेज कॅम्पसमध्येच ओळख झाली आणि ही मैत्री आणखी घट्ट झाली.

अमित अतिशय शांत आणि लाजऱ्या स्वभावाचे. काही वर्षांनंतर अमित यांनीच मितालीला प्रपोज केलं आणि तिनेही लगेच होकार दिला. या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि बघता बघता 10 वर्ष उलटली.

मिताली ही मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडेंच्या कन्या बी. जी. सोमानी आणि वांद्र्यांच्या फॅशन इस्टिट्यूटमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं. राज यांची धाकटी कन्या उर्वशी ठाकरेंसोबत 'द रॅक' नावाचं बुटीक सुरु केलं.

मिताली आणि उर्वशी सख्ख्या आणि पक्क्या मैत्रिणी असल्यामुळे मितालीचं कृष्णकुंजवर येणं जाणं सुरुच होतं. त्यामुळे सासरेबुवा राज ठाकरे आणि सासूबाई शर्मिला ठाकरेंना अमित-मितालीच्या नात्याची आधीच कुणकुण लागली होती. अमित आणि मितालीने आपल्या प्रेमाबद्दल घरात सांगितलं आणि दोन्ही कुटुंबांनी होकारही दिला.

आयुष्याच्या खडतर प्रवासात खंबीरपणे साथ देणाराच तुमचा खरा साथीदार आणि भागीदार असतो. 2017 मध्ये अमित यांना दुर्धर आजारानं ग्रासलं. ठाकरे कुटुंब आणि मितालीसाठी मोठा धक्का होता. राज ठाकरेही अस्वस्थ होते, मात्र अमितला भक्कम साथ मिळाली ती मितालीची.

आजारपणाच्या काळात मितालीने अमितची काळजी घेतली. अमितसोबतच राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंना धीर दिला. अमित आजारपणातून बाहेर आल्यानंतर काही दिवसातच दोघांचा साखरपुडा झाला. आता 27 जानेवारीला हे बंधन आणखी घट्ट होणार आहे.

म्हणूनच हे लग्न... फक्त एका सेलिब्रिटीचं किंवा हायप्रोफाईल म्हणून महत्त्वाचं नाही. तर या दोघांच्या घट्ट नात्याला अधोरेखित करणारं... आणि निस्सिम प्रेमाची परिभाषा ठरवणारं आहे...