मुंबई : वाशी vashi खाडी पुलावर होऊ घातलेल्या खाडी पुलला कोळी समाजानं कडाडून विरोध केला आहे. या पुलाचं बांधकाम पुढील चार ते पाच वर्षे सुरु राहणार आहे. त्यामुळं याचा थेट परिणाम मासेमारी व्यवसायावर होईल अशी भीती कोळी समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे.


नवी मुंबईतून मुंबईत प्रवेश करताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळं इथं आणखी एक खाडी पूल उभारण्याचा निर्णय एमएसआरडीसीनं घेतला. पण, पुलाच्या बांधकामामुळं मासेमारी व्यवसायावर याचा विपरित परिणाम होईल अशी भीती कोळी समाजाकडून सातत्यानं व्यक्त करण्यात येत आहे.


वाहतुक कोंडीवर उपाय म्हणून वाशी खाडीवर आमखी एका म्हणजेच तिसऱ्या खाडी पुलाच्या बांधकामाचे आदेश MSRDC नं दिले होते. 2023 किंवा त्यापुढील आणखी एका वर्षापर्यंत या पुलाचं बांधकाम पूर्ण राहणार असल्याचं सांगण्यात आल होतं. सध्या वाहतूक सुरु असणाऱ्या खाडी पुलाच्या शेजारीच नव्या बांधकामाची तयारी करण्यात आली आहे. या पुलासाठी जवळपास 775 कोटींहून अधिक रक्कम खर्चली जाणार असल्याचं कळत आहे. रेल्वे रुळ आणि सध्याचा खाडी पूल यांच्यामध्ये असणाऱ्या जागेमध्ये या पुलाच्या बांधकामाला सुरुवातही करण्यात आली होती. पण, आता कोळी समाजाकडून या खाडी पुलाला होणारा विरोध पाहता पुलाच्या बांधकामासंबंधी कोणता निर्णय़ होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


दरम्यान, एकिकडे वाशी खाडीवर होणाऱ्या नव्या खाडी पुलाला विरोध होत असतानाच दुसरीकडे आणखी एका कारणासाठी कोळी समाज आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण ठरत आहे ते म्हणजे केंद्र सरकारचं प्रस्तावित वाढवण बंदर.


केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदर विरोधात सोमवारी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीकडून बंदची हाक देण्यात आली होती. मुंबईतील कफ परेड ते डहाणूच्या झाईपर्यंत कोळीवाडे आणि गावांमध्ये हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदला अनेक मच्छीमार संघटना तसेच रिक्षाचालक-मालक संघटनांनी देखील पाठिंबा दिला. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. ज्या धर्तीवर किनारपट्टीवरील बाजारपेठा, मच्छीबाजार बंद ठेवण्यात आले होते.