मुंबई : स्वतःला पोलीस म्हणून भासवून लोकांची फसवूनक करणाऱ्या टीव्ही आणि सिने कलाकाराला केली अटक. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सलमान इर्फ जाकीर असे असून त्याने 'चित्तोड की रानी पद्मिनी' , 'राजा शिवाजी महाराज', 'सावधान इंडिया' या मालिकांमध्ये तर 'गुलमकई' 'बहनचोर' अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे.


नेमकं काय आहे प्रकरण?


3 डिसेंबर 2020 रोजी पटेलनगर देहरादून येथे दोन अनोळखी इसमांनी पोलीस म्हणून काही लोकांची फसवणूक केली आणि त्यांच्याजवळ असलेल्या पाच लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन तिथून पसार झाले.


वृद्ध महिलेने पटेल नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तत्काळ गुन्हा नोंदवला आणि युद्धपातळीवर तपास सुरु केला. तंत्रज्ञानाचा वापर करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी मुंबईच्या अंधेरी परिसरात असल्याचा सुगावा देहरादून पोलिसांना लागला. त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांची मदत मागितली आणि गुन्हे प्रकटीकरण शाखा 8 हे देहरादून पोलिसांच्या मदतीस सज्ज झाले. गुन्हे प्रकटीकरण शाखा, गुन्हे अन्वेषन विभाग शाखा 8 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत शेलार, प्रथमेश विचारे पोलीस उपनिरीक्षक अमित देवकर व पथकाने उत्तराखंड पोलिसांसोबत मिळून त्यांच्या जवळ असलेल्या सायबर माहितीचा अभ्यास केला आणि आपल्या गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनंतर अंबे सोसायटी ओशिवरा अंधेरी पूर्व येथून 40 वर्षीय सलमान उर्फ जाकीरला ताब्यात घेतलं.


सुरुवातीला सलमानं उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवत प्रश्न विचारल्यानंतर सलमानने आपला गुन्हा मान्य केला. स्वतःला पोलीस भासवून लोकांची फसवणूक करण्यासाठी सलमान विमानाने येजा करायचा. त्याच्यावर याच स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. नाशिकमध्ये 3 तर उत्तराखंडमध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


या गुन्ह्याचा तपास पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वीरेश प्रभू यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण 1) अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरीक्षक संजीव गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत, प्रथमेश विचारे आणि पोलीस उपनिरीक्षक अमित देवकर व पथकाद्वारे करण्यात आला.