मुंबई: मुंबईमध्ये सध्या मासे खाणाऱ्या खवय्यांची कोंडी झालेली दिसून येत आहे. कारण एकीकडे पावसाळ्यात मत्स्यबंदी असताना दुसरीकडे जे मासे सहज मिळतात, त्याचाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे माशांचे भाव प्रचंड वाढले आहेत.

पावसाळ्यात जून महिन्यापासून नारळी पौर्णिमेपर्यंत समुद्रात मासेमारी बंद केली जाते.

त्यामुळे या 3 महिन्यात बाजारात मासे कमी प्रमाणात असतात. पण बोंबील, मांदेली असे मुंबई आणि आसपासच्या समुद्रात हमखास सापडले जाणारे आणि पावसाळ्यातदेखील उपलब्ध असणारे मासेही मच्छी मार्केटमध्ये कमी प्रमाणात येत आहेत.

त्यामुळे याआधी पकडलेले, बर्फात ठेवलेले मासेच सध्या विक्रीसाठी आहेत. परिणामी त्यांची किंमत प्रचंड आहे.

20 ते 30 रुपयांची मासळीदेखील शंभरच्याघरात विकली  जात आहे. त्यामुळे मासे खाणाऱ्यांच्या खिशाला चाट पडला आहे.

याचे दूसरे असेही कारण सांगितले जात आहे, ते म्हणजे खारफुटीची कत्तल केल्याने, यांत्रिक मासेमारी आणि समुद्रातील प्रदूषण याचा थेट परिणाम माशाच्या प्रजननावर होत आहे. त्यामुळे समुद्रात पावसाळ्यात मिळणारे बोंबील, मांदेलीसारखे मासेदेखील कमी मिळत आहेत. परिणामी मासे चढ्या किमतीने विकले जात आहेत.

सध्याचे माशाचे दर

आधी       आता

मांदेली (वाटा)                20          90 ते 100 रुपये

बोंबील(वाटा)               30-40     100 ते 120 रुपये

सूरमई (1 नग)              100-150   250 ते 300 रुपये

मोठी कोंळबी (किलो)      200         250