मुंबई : किमान आठवड्यातून एक दिवस ताटात मच्छीचा तुकडा असल्याखेरीज अनेकांचं जेवण होत नाही. पण, सध्या ताटातली मच्छी दुरावली आहे. मासळी बाजारात माशांच्या किंमती 30 टक्क्यांनी महागल्या आहेत. बांगडा, सुरमई, पापलेट, कोलंबीची भूक कांद्या-टोमॅटोवर भागवावी तर ते ही शक्य नाही. कारण एक किलोसाठी भाज्यांच्या किंमतीही ऐंशीपार गेल्या आहेत.
अरबी समुद्रातील 'क्यार' चक्रीवादळाने मासेमारीवर मोठा परिणाम झाला आहे. सतर्कतेचा उपाय म्हणून वसई, पालघर, डहाणू, कुलाबा इथली मासेमारीवर बंद आहे. त्यामुळे, मुंबईच्या मासळी बाजारात येणारी माशांची आवक 60 टक्क्यांनी कमी झाली आहे. परिणामी माशांच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एरव्ही 300 ते 400 पर्यंत मिळणाऱ्या माशांसाठी आठशे ते हजार रुपये मोजावे लागत आहेत.
महागाईमुळे मासेप्रेमींनी सक्तीने शाकाहारी व्हायचं म्हटलं तर ते ही फारसं परवडणारं नाही. कारण, कांद्यासोबतच इतर भाज्यांचे दरही 80 रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.
कांदा किरकोळ बाजारात 80 ते 90 रुपये किलो आहे. तर, फ्लॉवर, कोबी, वाल, गवार या भाज्यांचे भावही 80 रुपये प्रतिकिलो झाले आहेत.
हिवाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या पालेभाज्या तर बाजारात नजरेलाही पारख्या झाल्या आहेत. पालेभाज्या, कोथिंबीरीची एक जुडी 70 ते 80 रुपयांपर्यंत विकली जात आहे. त्यामुळे, ताटात आता नेमकं वाढून घ्यायचं तरी काय हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
महागाईने मांसाहार दुरावलाच पण शाकाहारही परवडेना!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Nov 2019 05:24 PM (IST)
अवकाळी पावसामुळे भाज्या तर चक्रीवादळामुळे मासे महागले आहेत. भाज्या शेतातच कुजल्याने आवक घटली आहे परिणामी पालक-कोथिंबिरीची जुडी 70 रुपयांवर गेली आहे. तर 200-300 रुपयांना मिळणार मासे आता 800 ते 1000 रुपयांना मिळणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -