मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आमदार काही भाजीपाला नाही, हिंमत असेल तर आमचे आमदार फोडून दाखवावे, असे आव्हान शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपला दिले आहे.

एकतर्फी सुरु असलेल्या शिवसेनेला भाजपकडून चर्चेची दारे खुली करण्यात आली. मात्र, त्यानंतरही सत्तास्थापनेचा तिढा सुटताना दिसत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. खबदारीचा उपाय म्हणून या बैठकीत मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे.

काय झाले बैठकीत?
बैठकीतील आमदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले म्हणणे मांडले. लोकसभेवेळी जे ठरलं होतं, त्याप्रमाणे सत्तेत समसमान वाटपावर उद्धव ठाकरे ठाम असल्याची माहिती मिळत आहे. सोबतच मी स्वतःहून युती तोडणार नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आता निर्णयाचा चेंडू पुन्हा एकदा भाजपच्या कोर्टात गेला आहे. बैठकीनंतर एबीपी माझाशी बोलताना शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.

आमदार फोडले जाऊ नये म्हणून शिवसेनेची खबरदारी
बैठकीनंतर शिवसेनेच्या आमदारांशी इतर कोणाचाही संपर्क होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची रवानगी हॉटेल रंगशारदा येथे होणार आहे. आमदार फुटीच्या भीतीने सेनेने हे पाऊल उचलल्याचं कळतं. सत्ताधाऱ्यांनी सर्व पक्षांचे आमदार फोडण्याचा गेल्या काही दिवसात प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यासाठी भाजपने गुंडांचा, धमक्यांचा वापर केल्याचेदेखील राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे.

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार - सुधीर मुनगंटीवार

'मातोश्री'वरील शिवसेना आमदारांच्या बैठकीत मोबाईल फोनवर बंदी

आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरु? शिवसेना आमदार म्हणतात...