मुंबई : परळ आणि करीरोड इथं लष्कराकडून पादचारी पूल उभारण्याचं कामसाठी मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते दादर दरम्यान उद्या विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकलसेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. सकाळी 8.30 वाजल्यापासून हा मेगा ब्लॉक सकाळ होणार आहे.


एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मध्य रेल्वे मार्गावरील परळ करी रोड आणि एल्फिन्स्टन स्टेशनवर नवीन पादचारी पूल बांधण्याचं काम लष्कराकडून युद्धपातळीवर सुरु आहे. याच कामासाठी एलफिन्स्टन स्टेशन आणि परळमध्ये पूलाच्या कामासाठी 27 जानेवारी रोजी विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्याच प्रमाणे आता परळ आणि करीरोड इथं पूल उभारण्यासाठी उद्या 4 फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळी 8.30 वाजल्यापासून पादचारी पूल उभारण्याचं काम सुरु होईल. त्यामुळे सीएसएमटी ते दादर स्थानकादरम्यानची जलद आणि धिम्या मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णपणे बंद राहिल. दादरपासूनच पुढे कल्याण, कर्जत, कसारासाठी लोकल गाड्या चालविण्यात येतील.

दुसरीकडे या मेगाब्लॉकमुळे अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबईहून कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस आणि मुंबईहून नागपूरला जाणारी सेवाग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. याशिवाय, सिंहगड एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आणि पंचवटी एक्स्प्रेस या गाड्या ही रद्द करण्यात आल्या आहेत.

तर पश्चिम मार्गावर अंधेरी ते गोरेगावदरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावर सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील लोकल गाड्या धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.

संबंधित बातम्या

लष्कराकडून एलफिन्स्टन पुलाचं काम वेगात, दोन दिवसांचा मेगाब्लॉक