मुंबई : मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षेसाठी बाऊन्सर्स तैनात करण्यात आले आहेत. पालिकेचे साडेतीन हजार सुरक्षा रक्षक असतानाही थेट खाजगी सुरक्षा रक्षक नेमून लाखोंची उधळपट्टी करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.


मुंबई महापालिका आयुक्तांना कुणापासून धोका आहे, की पालिका आयुक्त कुणाला इतकं घाबरतायत. पालिकेत खाजगी बाऊन्सर्सना बोलवण्याची वेळ का आलीय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

बॉलिवूडमधील सेलिब्रिटी लोकांच्या मागेपुढं असणारे हे बाऊन्सर्स आता मुंबई महापालिकेत पहायला मिळत आहेत. पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांच्या कार्यालयाबाहेर इतकी कडक सुरक्षा व्यवस्था कधीच नव्हती. परंतु आता मात्र काळ्या ड्रेसमधील, बॉडी कमावलेले बाऊन्सर्स पहायला मिळत आहेत. आयुक्त कार्यालयाबाहेरच्या व्हरांड्यातून इकडून तिकडं जाणाऱ्यांचीही कसून चौकशी केली जात आहे. असं काय झालंय की आयुक्तांना पालिकेच्या सुरक्षा रक्षकांवर भरवसा राहिला नाही. विरोधकांनी यासंदर्भात आयुक्तांना लक्ष्य केलं आहे.

मागील आठवड्यात भाजप नगरसेवकांनी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करून त्यांच्या नेमप्लेटवर निषेधाचे फलक चिकटवले होते. तसंच बेस्टच्या महाव्यवस्थापकांना घेराव घालत त्यांना कोंडून ठेवले होते. याचाच धसका बहुधा आयुक्तांनी घेतल्याचे दिसतं आहे.. नगरसेवक हे गुंड आहेत का, त्याच्यासाठी बाऊन्सर्स बोलवले जात आहेत, असा प्रश्न भाजपनं उपस्थित केला आहे.

आयुक्तांनी बाऊन्सर्स नेमण्याला महापौरांनीही विरोध केला आहे. बाऊन्सर्सची गरज त्यांना असते जे वाईट कामं करतात. आयुक्तांना तशी गरज वाटत नाही असं त्यांनी म्हणलं आहे. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांबरोबर खाजगी सुरक्षा रक्षक मुख्यालयाच्या प्रत्येक गेटवर पहायला मिळत आहेत. त्यामुळं आयुक्तांना नेमकी कुणाची भीती वाटतंय, ज्यासाठी एवढा वारेमाप खर्च करण्याची वेळ आली आहे, असा सवाल उपस्थित होतोय.