मुंबई : क्रिकेटमध्ये करिअर करता आले नाही म्हणून मुंबईत एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करण तिवारी असं या क्रिकेटपटूचं नाव असून त्याने मुंबई उपनगरातील मालाड पूर्वेमधल्या राहत्या घरी सोमवारी (10 ऑगस्ट) गळफास घेतला. तणावातून त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. कोणतीही सुसाईड नोट त्याच्याकडे सापडलेली नाही. कुरार पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.


मालाडमध्ये करण तिवारी आपल्या आई आणि भावासोबत राहत होता. कोरोनामुळे करिअरमध्ये आयपीएल किंवा मोठ्या मॅचमध्ये खेळायची संधी हुकल्याने करण तिवारीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या तरुणाने शेवटचा फोन राजस्थानमध्ये असलेल्या आपल्या मित्राला केला होता. मी मानसिक तणावात असून मी आत्महत्या करत असल्याचं त्याने मित्राला सांगितलं. यानंतर मित्राने तातडीने याची माहिती राजस्थानमध्येच राहत असलेल्या करणच्या बहिणीला दिली. हे कळताच करणच्या बहिणीने सबंध प्रकार आईला सांगितला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.


रात्रीच्या जेवणानंतर करण तिवारी साडेदहाच्या सुमारास त्याच्या खोलीत गेला आणि दरवाजा बंद करुन घेतला. करण दरवाजा उघड नाही म्हणून लॉक तोडण्यात आलं. त्यावेळी करणचा मृतदेह समोर दिसला. दरम्यान पुढील तपास कुरार पोलिस करत आहेत.


करणचा मित्र जितू वर्माच्या माहितीनुसार, "क्रिकेट खेळण्यासाठी त्याची धडपड सुरु होती." तर "मी त्याच्यासाठी चांगला स्थानिक क्लब शोधण्याचा प्रयत्न करत होतो," असं मुंबई सीनिअर संघाचे प्रशिक्षक विनायक सामंत यांनी सांगितलं.